इवलुशा पक्ष्यांची घरटी वाचवण्यास सरसावले अनेक शास्त्रज्ञांचे हात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 07:53 AM2024-01-21T07:53:38+5:302024-01-21T07:54:22+5:30
वेंगुर्ला द्वीपसमूहात आहे जगातील सर्वांत मोठी वीण वसाहत
- संदीप बोडवे
मालवण (जि. सिंधुदुर्ग) : वेंगुर्ला द्वीप समूहातील बर्ड आयलँड बेटावरील गुहेत असलेल्या भारतीय पाकोळी (इंडियन स्विफ्टलेट) या पक्ष्याच्या जगातील सर्वांत मोठ्या वीण वसाहतीचे संवर्धन करण्यासाठी सॅकॉनचे शास्त्रज्ञ पुढे सरसावले आहेत. त्यांनी याबाबतचा संवर्धन आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले असून, लवकरच हा आराखडा भारत सरकारला सादर करण्यात येणार आहे.
सॅकॉनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गोल्डिन क्वार्ड्रोज, डॉ. शिरीष मंची यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ संशोधक धनुषा कावलकर या २०२० पासून भारतीय पाकोळी पक्ष्यांच्या वसाहतींचे संशोधन करीत आहेत.
भारतातील सर्वांत मोठी वसाहत
जगभरात या पक्षाच्या १३ वीण वसाहती आहेत. महाराष्ट्रात या पक्ष्यांच्या सहा वसाहती असून, वेंगुर्ले दीप समूहातील बर्ड आयलँड या बेटावर भारतीय पाकोळीची जगातील सर्वांत मोठी वीण वसाहत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
गुहेत पाच ते सहा हजार पक्ष्यांचे वास्तव्य
बर्ड आयलँड बेटावरील गुहेत पाच ते सहा हजार पक्षी वास्तव्य करून आहेत. या गुहेची लांबी ६१ मीटर व उंची १८ मीटर असून, भारतीय पाकोळीच्या वसाहतीने ही गुहा भरली आहे.तिची अधिकचे पक्षी वास्तव्य सामावण्याची क्षमता संपली आहे. यामुळे येथीलच ओल्ड लाइट हाउस या बेटावर दुसरी वसाहत तयार केली आहे.
पाकोळी पत्नीव्रता
भारतीय पाकोळी एक पत्नीव्रता असतात. त्यांचे पाय कमजोर असल्याने त्यांना एपोडेडी म्हणतात. ते कधीही जमिनीवर उतरत नाहीत. पंजे मजबूत असल्याने ते लटकतात. हवेत तरंगत असल्याने एरोडायनामिक पक्षी म्हणून त्याना ओळख आहे.
लाळीपासून घरटे
भारतीय पाकोळी त्यांच्या लाळेपासून घरटी बनवितात. १० ग्रॅम वजनाचा पक्षी १० ग्रॅम लाळ उत्सर्जित करून आपले घरटे बनवितो. याला ६० ते ९० दिवसांचा कालावधी लागतो. कीटक हे त्यांचे खाद्य आहे.