लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम सुजाण मतदारांचे, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडेंचे मत
By अनंत खं.जाधव | Published: September 5, 2023 05:37 PM2023-09-05T17:37:44+5:302023-09-05T17:38:22+5:30
सावंतवाडीत लोकशाही जीवन प्रणाली व शिक्षण यावर परिसंवाद
सावंतवाडी : भारताच्या लोकशाही समोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत, परंतु भारतीय लोकशाही अधिक प्रौढ झाली. स्वातंत्र्यानंतर भारतीय लोकशाही तोडण्याचे काम अनेक वेळा झाले. परंतु लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम येथील सुजाण मतदारांनी केले आहे. सुजाण मतदार हे भारतीय लोकशाहीचे मर्मस्थान, बलस्थान आहे असे मत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मांडले.
राज्य निवडणूक आयोग, भोसले नॉलेज सिटी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यावतीने आज, मंगळवारी भोसले नॉलेज सिटी येथे लोकशाही जीवन प्रणाली आणि शिक्षण या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देशपांडे बोलत होते.
देशपांडे म्हणाले, भारतीय लोकशाहीचा विचार करता अजून काही घटक परीघाबाहेर आहेत त्यांना लोकशाही प्रक्रियेत सामावून घेतले पाहिजे. आज भारतात तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तरुण मतदार 5.5% आहेत त्यापैकी 0.68% इतक्याच तरुण मतदारांचे नाव मतदार यादीत आहे हे चित्र बदलले पाहिजे.
मतदानाप्रती असलेली उदासीनता ही चिंतेची बाब आहे. युवा मतदारांना लोकशाही प्रक्रियेत सामावून घेतले पाहिजे त्यांनी जास्तीत जास्त मतदान केले पाहिजे. या संदर्भात लोकशिक्षण महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही लोकशाही गप्पाच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचत असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
प्रकाश परब म्हणाले, सध्या समाजाची दोन विभागात विभागणी झाली आहे. आभाषी समाज आणि डिजिटल समाज अशी ही विभागणी आहे. सोशल मीडियाने जग व्यापले आहे. अशा परिस्थितीत लोकशाही समोर आव्हान निर्माण झाले आहे. त्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. लोकसहभाग हा लोकशाहीचा आत्मा आहे असे परब यांनी स्पष्ट केले.
अभिनेत्री संपदा जोगळेकर यांनी आपण शेती क्षेत्रात उतरलो रसायनमुक्त अन्नधान्य मिळणे या पुढच्या काळात महत्त्वाचे आहे भविष्यात अन्नाचे दुर्भक्ष जाणवणार आहे त्यामुळे प्रत्येकाने स्वतः पुरते का होईना शेती केली पाहिजे कोरोनाचे संकट येईल असे दहा वर्षापूर्वी कोणाला वाटले नव्हते परंतु ते आले हीच बाब अन्नाच्या दुर्लक्षा बाबत होणार आहे असे सांगितले.
या परिसंवादामध्ये भाषाभ्यासक डॉ. प्रकाश परब, अभिनेत्री संपदा जोगळेकर, प्राचार्य शमशुद्दीन नसीरुद्दीन आत्तार, सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबळेकर, छायाचित्रकार इंद्रजीत खांबे, मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार जुईली पांगम, मोहम्मद शेख, प्रसाद गावडे, पंकज दळवी, हसन खान हे युवा प्रतिनिध सहभागी झाले होते.तर जिल्हाधिकारी किशोर तावडे प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर तहसीलदार श्रीधर पाटील भोसले नॉलेज सिटी चे अच्युत सावंत भोसले यावेळी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.