Sindhudurg: तिलारी धरणाच्या डाव्या कालव्याला भगदाड, गोव्याला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 17, 2024 07:16 PM2024-08-17T19:16:42+5:302024-08-17T19:17:25+5:30
कुडासे धनगरवाडी येथील घटना : रस्त्याला नदीचे स्वरूप, भातशेतीही घुसले
वैभव साळकर
दोडामार्ग : ताडपत्री घालून तात्पुरती डागडुजी केलेला तिलारी धरणाच्या डाव्या कालव्याला शनिवारी भगदाड पडले. ही घटना कुडासे धनगरवाडी येथे घडली. कालव्याचे पाणी रस्त्यावर आल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले. तसेच ते भातशेतीतही घुसले. लागलीच या घटनेची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला.
भगदाड पडलेल्या कालव्याच्या ठिकाणी एक मोरी आहे. कालव्यालगतच्या डोंगराळ भागातील पाणी या मोरीतून सखल भागात जाते. या कालव्याच्या बांधकामास जवळपास २५ ते ३० वर्षांचा कालावधी लोटला आहे. परिणामी ही मोरी खचली. मात्र याकडे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले व याचा विपरीत परिणाम शनिवारी सकाळी जाणवला आणि कालव्याला भगदाड पडण्याची दुर्दैवी घटना घडली.
गोव्याला जाणारे पाणी तीन आठवडे बंद राहणार
परिणामी गोव्याला होणारा पाणीपुरवठा सध्या बंद आहे. शिवाय सध्या पाऊस पडत असल्याने काम सुरू करण्यास अडचणी येणार आहेत. तरीही लवकरच काम सुरू केले जाईल असे कार्यकरी अभियंता विनायक जाधव यांनी सांगितले. शिवाय गोव्याला जाणारे हे पाणी दोन ते तीन आठवड्यांसाठी बंद राहणार असल्याचेही ते म्हणाले. फुटलेल्या कालव्याची पाहणी दोडामार्ग (गोवा) येथील जलसंपदा विभागाचे उपकार्यकारी अधिकारी आनंद पंचवाडकर यांनी केली. तसेच पाणी बंद झाल्यामुळे गोव्यावर पाणीटंचाईचे सावट आल्याचे ते म्हणाले.
अधिकाऱ्यांना धरले धारेवर
कालव्याला भगदाड पडल्याची माहिती तेथील शेतकऱ्यांनी पत्रकारांना दिली. शिवाय संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनादेखील कळविले. ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान कालव्यातून पाणी प्रवाह बंद करण्यात आला. यावेळी त्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. दिवसा घटना घडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु जर हीच घटना रात्री घडली असती तर याला जबाबदार कोण ठरला असता, असा सवाल उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख संजय गवस, युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे यांनी विचारला. तसेच जलसंपदा विभाग हा सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.