पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आंबोलीतील मुख्य धबधबा झाला प्रवाहित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 05:59 PM2022-06-22T17:59:07+5:302022-06-22T18:01:30+5:30
आता पावसाळी पर्यटनाला बहर येणार असून पश्चिम महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, बेळगाव येथून मजा लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे.
आंबोली (सिंधुदुर्ग) : पावसाळी पर्यटनातील केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली या थंड हवेच्या ठिकाणी घाटात असलेला धबधबा गेले दोन दिवस पडत असलेल्या संततधार पावसाने अंशत: प्रवाहित झाला आहे. त्यामुळे आता पावसाळी पर्यटनाला बहर येणार असून पश्चिम महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, बेळगाव येथून मजा लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे.
आंबोलीमध्ये गेली दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे आंबोली घाटातील मुख्य धबधबा अंशतः प्रवाहित झाला आहे. आंबोलीमध्ये उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे अद्यापपर्यंत धबधबे सुरू झाले नव्हते. यामुळे येथील पर्यटन व्यवसाय धोक्यात आला होता. जुलैच्या अखेरीस श्रावण महिना सुरू होणार असून त्यानंतर आंबोलीतील वर्षा पर्यटन कमी होते. त्यामुळे श्रावणापूर्वी आंबोलीतील वर्षा पर्यटन बहरलेले असते. जर अशा पद्धतीने पाऊस उशिरा सुरू झाल्याने व धबधबा उशिरा प्रवाहित झाल्याने आंबोलीतील पर्यटन व्यवसायाचे दिवस कमी कमी होत जातील. त्यामुळे इथल्या पर्यटन व्यावसायिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.
रविवारपासून पर्यटन बहरणार
मंगळवार आणि बुधवारी आंबोलीमध्ये पडत असलेल्या पावसामुळे आंबोलीतील मुख्य धबधब्यासह इतर छोटे-मोठे धबधबे काहीअंशी प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे आता आंबोलीचे पर्यटन येत्या रविवारपासून बहरणार आहे. त्या अनुषंगाने आंबोलीतील सर्वच्या सर्व पर्यटन स्थळांवरती आंबोली ग्रामपंचायत तसेच पोलीस यांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे. आंबोलीत आत्तापर्यंत केवळ दहा इंच पावसाची नोंद झाली असून हा पाऊस गेल्या अनेक वर्षांतील सर्वात कमी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.