वृद्धाचा मृतदेह तिलारी डाव्या कालव्यात आढळला
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 14, 2023 06:08 PM2023-05-14T18:08:52+5:302023-05-14T18:09:03+5:30
दोडामार्ग सुरूचीवाडी येथील घटना
दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर पडलेल्या वयोवृध्दाचा मृतदेह सुरुचीवाडी येथील तिलारी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात रविवारी आढळून आल्याने खळबळ उडाली. सुरेश केशव गवस (७२ रा.कसई-धाटवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांचा तोल जाऊन पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दोडामार्ग पोलिसांनी सध्यातरी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
सुरेश गवस हे मूळ पिकुळे गावचे रहिवासी ; मात्र गेल्या काही वर्षांपासून ते कसई-धाटवाडी येथे घर बांधून आपल्या कुटुंबीयांसह राहत होते. दरदिवशी त्यांना मॉर्निंग वॉक करण्याची सवय होती. त्यासाठी ते नेहमी कालव्याच्या रस्त्याने जात असत. नेहमीप्रमाणे रविवारीही ते सकाळीच मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले. मात्र बराच वेळ झाला तरी ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली .याचदरम्यान सुरुचीवाडी येथे कालव्यात रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीला पाण्यात तरंगत असलेला मृतदेह दिसला.
याबाबतची माहिती त्याने कसई-दोडामार्ग चे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांना दिली. त्यांनी पोलिसांना कळविल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तर तोपर्यंत गवस यांचे कुटुंबीयही त्याठिकाणी पोहोचले. पोलिसांनी ओळख पटवून घेतली असता सकाळी मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडलेल्या सुरेश गवस यांचाच तो मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनतर मृतदेह कालव्याबाहेर काढून तो उत्तरीय तपासणीसाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. सध्या तरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास दोडामार्ग पोलिस करीत आहेत.