युती तोडणाऱ्यांना जनताच जागा दाखवेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 11:41 AM2024-10-24T11:41:29+5:302024-10-24T11:44:35+5:30
कुडाळ (सिंधुदुर्ग) : शिवसेना आणि भाजपची ३० वर्षे पारंपरिक युती होती. ही युती ज्यांनी तोडली आणि बाळासाहेबांचे विचार सोडले ...
कुडाळ (सिंधुदुर्ग) : शिवसेना आणि भाजपची ३० वर्षे पारंपरिक युती होती. ही युती ज्यांनी तोडली आणि बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी लगावला.
कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर माजी खासदार नीलेश राणे यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री नारायण राणे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार रवींद्र फाटक, राजापूरचे शिवसेना उमेदवार किरण सामंत, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नितेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, अशोक दळवी, शिवसेना पक्ष निरीक्षक बाळा चिंदरकर, दीपक वेतकर, बँक अध्यक्ष मनीष दळवी आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोकणी जनतेने एका हातात धनुष्य-बाण आणि कमळ हाती घेतले आहे. महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना स्वातंत्र्य मिळाले आहे. आम्ही विकासाला चालना देण्याचे काम करीत आहोत. महायुतीचा विकास हाच अजेंडा असून, कोकण विकासाचा बॅकलॉग भरण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
कोकणवासीयांसाठी ऐतिहासिक दिवस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेना आणि कोकणवासीयांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. नीलेश राणे यांची घर वापसी आहे. नारायण राणे यांचे आभार मानतो, कारण त्यांच्या प्रवेशाला परवानगी दिली. नीलेश राणे यांच्या प्रवेशाने महायुतीची ताकद वाढली. दिवाळीचे फटाके फोडा आणि नीलेश राणे यांच्या विजयाचे फटाके फोडायला मी येईन. नीलेश राणेंच्या प्रवेशाने महायुतीला एक बळ मिळाले आहे.
शिवसेनेत फाटाफूट झाली नसती तर..
आम्ही सर्वजण एकत्र आहोत. कोकण हा बाळासाहेबांचा बालेकिल्ला आहे. एक शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री आम्ही बघितले आहे. कार्यकर्ते कसे जपायचे हे राणे यांच्याकडून शिकायचे आहे. आम्ही पोटनिवडणूक पाहिली आहे. कर्तृत्ववान माणसे कशी घालवायची हे काम उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिले आहे. शिवसेनेत फाटाफूट झाली नसती, तर कोणी आव्हान दिले नसते, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.