आंगणेवाडीतील भराडी देवीचा आजपासून यात्रोत्सव, लाखो भाविक दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 13:07 IST2025-02-22T13:07:21+5:302025-02-22T13:07:41+5:30

प्रशासनाचे नियोजन पूर्ण; नऊ रांगांमधून होणार देवीचे दर्शन

The pilgrimage festival of Bharadi Devi in Anganwadi will begin from today | आंगणेवाडीतील भराडी देवीचा आजपासून यात्रोत्सव, लाखो भाविक दाखल होणार

आंगणेवाडीतील भराडी देवीचा आजपासून यात्रोत्सव, लाखो भाविक दाखल होणार

मालवण : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि दक्षिण कोकणातील काशी म्हणून प्रसिद्ध मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीचा यात्रोत्सव शनिवार (दि.२२) व रविवारी (दि. २३) साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने प्रशासनाने ग्रामस्थांना हाताशी धरत योग्य नियोजन केले आहे. शनिवारी पहाटे ३ वाजल्यापासूनच देवीच्या दर्शनास आणि ओटी भरण्यास सुरुवात होणार आहे. तब्बल नऊ रांगांमधून देवीचे दर्शन दिले जाणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंडळाने दिली.

भराडी मातेच्या दर्शनासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक येणार असल्याने कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. गेले अनेक दिवस सुरू असलेली तयारी आंगणे कुटुंबीय, जिल्हा प्रशासन यांनी पूर्ण केली आहे. यात्रेत आठ लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज ग्रामविकास मंडळाकडून व्यक्त केला जात आहे.

कोट्यवधींची उलाढाल

देवीच्या चरणी श्रद्धेने, मनोभावे केलेला नवस पूर्ण होतोच होतो. मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून भराडी देवीची महती सर्वदूर पोहोचल्याने एका चाकरमान्यासोबत राज्याच्या विविध भागातील त्याचे मित्र आंगणेवाडीच्या जत्रेत दिसून येतात. दोन दिवसांच्या या यात्रेत कोट्यवधीची उलाढाल होते.

चोख पोलिस बंदोबस्त, सीसीटीव्हींची नजर

यात्रोत्सव काळात ६ पोलिस उपअधीक्षक यांच्यासह ५१ अधिकारी, ६५० पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड तसेच दोन दंगल नियंत्रक पथक, घातपात विरोधी पथक नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय ५० सीसीटीव्ही कॅमेरे, दहा व्हिडीओ शूटिंग कॅमेरे आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली आहे.

लाखो चाकरमानी दाखल

या यात्रोत्सवासाठी मुंबई येथून लाखो चाकरमानी दाखल होतात. गेले दोन दिवस खासगी गाड्या, कोकण रेल्वे, एसटी बसेसच्या माध्यमातून लाखो चाकरमानी आंगणेवाडीत दाखल होत आहेत. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील कणकवलीपासून आंगणेवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी वाहतुकीची समस्या भेडसावत आहे.

Web Title: The pilgrimage festival of Bharadi Devi in Anganwadi will begin from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.