राज्यातील शत्रू मालमत्तांच्या विक्रीची प्रक्रिया सुरू, केंद्राला आतापर्यंत ३,४०० कोटींचा महसूल मिळाला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 12:18 PM2023-08-01T12:18:45+5:302023-08-01T12:19:05+5:30
राज्यात २०८ मालमत्ता : सिंधुदुर्गात एक, रत्नागिरीत अकरांचा समावेश
ओरोस : पाकिस्तान व चीनचे नागरिकत्व पत्करलेल्या लोकांच्या भारतामध्ये मालमत्ता आहेत. त्यातून त्यांना बेदखल करण्याची तसेच या मालमत्ता विकण्याची प्रक्रिया केंद्रीय गृह मंत्रालयाने सुरू केली आहे. अशा मालमत्तांना शत्रू मालमत्ता (एनिमी प्रॉपर्टी) असे म्हटले जाते. महाराष्ट्र राज्यात अशा २०८ मालमत्ता असून, पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीची सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला येथे १ तर रत्नागिरी जिल्ह्यात ११ ठिकाणांचा समावेश आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात ही शत्रू मालमत्ता असून, त्याची किंमत सुमारे १० कोटी रुपये एवढी आहे. या शत्रू मालमत्तेची विक्री करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. या मालमत्ता सध्या कस्टोडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी फॉर इंडिया (सीईपीआय) यांच्या ताब्यात आहे.
पाकिस्तान व चीनचे नागरिकत्व पत्करलेल्या लोकांच्या भारतामध्ये मालमत्ता आहेत. अशा देशभरात १२,६११ मालमत्ता असून, त्यांची किंमत सुमारे १ लाख कोटी रुपये आहे. त्यांची विक्री करण्यासाठी असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने सुधारणा केली आहे. शत्रू मालमत्ता गटातील ज्या मालमत्तांची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे, ती जागा खरेदी करण्यासाठी सध्या तिथे राहात असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल. त्याने ही जागा विकत न घेतल्यास नियमानुसार ती इतरांना विकण्यात येणार आहे.
केंद्राला आतापर्यंत ३,४०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला
एक कोटी रुपये व त्याहून अधिक आणि १०० कोटी रुपयांपेक्षा कमी मूल्य असलेल्या शत्रू मालमत्तांची सीईपीआय ई-लिलाव किंवा अन्य कायदेशीर मार्गाने विक्री करू शकते. शत्रू मालमत्तेपैकी सोने, शेअर अशा जंगम संपत्तीची विक्री करून केंद्र सरकारला आतापर्यंत ३,४०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मात्र, शत्रू मालमत्तांपैकी १२,६१९ जागांची अद्याप सरकारने विक्री केली नव्हती.
कमालीची गोपनीयता
शत्रू मालमत्तांसंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी गोपनीय विषय असल्याचे सांगत ह्या विषयाची माहिती देणे टाळले.
ही मालमत्ता हडपण्याचा घाट तर नाही ना
शत्रू मालमत्तेसंदर्भात प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. या गुप्ततेमुळे जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आले असून, ही मालमत्ता हडपण्याचा घाट काही व्यक्तींकडून सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
एकूण शत्रू मालमत्ता
महाराष्ट्र : २०८
सिंधुदुर्ग : १ (वेंगुर्ला)
रत्नागिरी : (११)