Sindhudurg: भुईबावडा घाटात नवीन संरक्षक भिंत कोसळली, रस्त्यालाही भेगा; वाहतूक धोकादायक
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 17, 2024 06:19 PM2024-07-17T18:19:24+5:302024-07-17T18:32:46+5:30
कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह?
प्रकाश काळे
वैभववाडी : भुईबावडा घाटातील संरक्षक भिंत कोसळली असून, रस्त्यालाही मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे हा घाटमार्गही वाहतुकीस धोकादायक बनत चालला आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यात बांधलेली ही संरक्षक भिंत कोसळल्यामुळे कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वाहनचालकांतून तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.
दुपदरीकरणासह काँक्रिटीकरणासाठी तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाट तब्बल सहा महिन्यांपासून बंद असल्यामुळे या मार्गावरील बरीचशी वाहतूक भुईबावडा घाटातून वळविण्यात आली आहे. परंतु, हा घाटमार्गही आता वाहतुकीस धोकादायक बनत चालला आहे. भुईबावडा घाटातील संरक्षक भिंतीचे बांधकाम यावर्षीच्या उन्हाळ्यात करण्यात आले होते. ही काँक्रीटची नवीन संरक्षक भिंत कोसळली असून, या भिंतीलगत रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे रस्ताही खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावर्षी बांधलेली संरक्षक भिंत पहिल्या पावसाळ्यातच कोसळल्यामुळे कामाचा दर्जा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धती विषयीच साशंकता व्यक्त केली जाऊ लागली आहे. वाहतुकीस बंद असलेल्या करूळ घाटातील संरक्षक भिंतीसह काँक्रीटचा रस्ता वाहून गेलेला असतानाच भुईबावडा घाटातील संरक्षक भिंतही कोसळल्यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वैभववाडी, तळेरे, देवगड, खारेपाटण परिसरातील शेकडो वाहनचालकांना कोल्हापूरला जाण्या-येण्यासाठी भुईबावडा हा एकमेव सोयीचा मार्ग सुरू आहे. मात्र, याच घाटात पडझड सुरू झाल्यामुळे व्यापारी चिंतेत आहेत. दरम्यान, बांधकाम विभागाने खचलेल्या संरक्षक भिंतीच्या ठिकाणी बॅरेल उभी केली आहेत. परंतु त्याच बॅरेलच्या बाजूला रस्त्याला भेगा पडलेल्या ठळकपणे दिसून येत आहेत. त्यामुळे अक्षरशः जीव मुठीत धरून भुईबावडा घाटातून प्रवास सुरू आहे.
कोट्यवधींचा खर्च; पण कामांचा दर्जा सुमारच!
मागील दोन वर्षांत भुईबावडा घाटात जवळपास २० ते २५ कोटी रुपयांची कामे झाली. त्यामध्ये रस्त्यांचे रुंदीकरण, बाजूपट्ट्या, संरक्षक भिंती बांधणे, गटारे आदी कामांचा समावेश आहे. परंतु, यातील बहुतांश कामे निकृष्ट झाली असल्याचे या घाटात पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच कोट्यवधींचा निधी खर्च पडूनही भुईबावडा घाटमार्ग असुरक्षितच असल्याची भावना वाहनचालकांमध्ये आहे.
दोन दिवसांपूर्वी भुईबावडा घाटातील संरक्षक भिंत कोसळली आहे. या भिंतीखालील भराव वाहून गेल्यामुळे संरक्षक भिंत कोसळली. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. -विनायक जोशी, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम, वैभववाडी