चक्रीवादळातील नुकसानीचा अहवालच वरिष्ठ कार्यालयाना पाठवला नाही!, महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने उघड केली धक्कादायक बाब

By सुधीर राणे | Published: May 28, 2024 05:20 PM2024-05-28T17:20:37+5:302024-05-28T17:21:28+5:30

कणकवली तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा भोंगळ कारभार

The report of the damage in the cyclone was not sent to the higher offices, The delegation of Mahavikas Aghadi revealed a shocking fact | चक्रीवादळातील नुकसानीचा अहवालच वरिष्ठ कार्यालयाना पाठवला नाही!, महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने उघड केली धक्कादायक बाब

चक्रीवादळातील नुकसानीचा अहवालच वरिष्ठ कार्यालयाना पाठवला नाही!, महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने उघड केली धक्कादायक बाब

कणकवली: कणकवली तालुक्यातील काही गावांमध्ये चक्रीवादळाने १५ दिवसांपूर्वी मोठे नुकसान झाले. यात फळबागायतींचा देखील समावेश आहे. या फळबागायतींचे पंचनामे कृषी सहायकांमार्फत झाल्यानंतर त्याचा अहवाल तहसीलदार व जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाला पाठवण्याची गरज होती. मात्र,दोन्ही कार्यालयाना तो अहवाल लेखी स्वरुपात पाठवलेला नाही, अशी धक्कादायक बाब मंगळवारी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने उघड केली. 

याबाबत प्रभारी तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव यांच्याशी शिष्टमंडळाने संपर्क साधला असता, अहवाल पाठवला आहे.त्याबाबत नंतर सांगतो, मी ओरोसला आहे .असे सांगत  उडवाउडवीची  उत्तरे दिली. त्यामुळे महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ संतप्त झाले.

कणकवली तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे या चक्रीवादळात नुकसान झाले आहे. यातील काही शेतकऱ्यांचे पंचनामे कृषी सहायकांमार्फत करण्यात आले. मात्र केलेल्या पंचनाम्याचा अहवाल हा तातडीने देण्याची गरज होती. तो दिलेला नसल्याने  शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहण्याची भीती असल्याची बाब महाविकास आघाडीच्या निदर्शनास आली. त्यामुळे  उद्धवसेनेचे युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर मंगळवारी धडक दिली. यावेळी कृषी अधिकारी कार्यालयात जबाबदार अधिकारी जागेवर नसल्याची बाब निदर्शनास आली.

त्यामुळे प्रभारी तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव यांच्याशी सुशांत नाईक यांनी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी सारवासारव करणारी उत्तरे देत अहवाल पाठवला अशी माहिती दिली. याच दरम्यान तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांच्याशी देखील नाईक यांनी संपर्क साधला. त्यांनी चक्रीवादळाबाबत कृषी विभागाचा नुकसानीचा अहवाल आपल्याकडे अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती दिली. त्यावर शिष्टमंडळाने कृषी अधीक्षक कार्यालयाकडे अहवाल पाठवला तर त्याची प्रत दाखवा.  आवक-जावक रजिस्टरची नोंद दाखवा अशी मागणी उपस्थित अधिकाऱ्यांकडे केली. यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या कृषी पर्यवेक्षक सावंत यांनी अहवाल पाठवलेला व्हाट्सअपचा मेसेज दाखवला. यावर शिष्टमंडळाने संतप्त भूमिका घेत व्हाट्सअपवर शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल पाठवून त्यांची चेष्टा करता काय? असा सवाल उपस्थित केला. 

यावेळी अर्जुन जाधव यांना तहसीलदार कार्यालयात बोलावून घेत त्यांच्याकडून याबाबतची सविस्तर माहिती घ्या व उद्या या संदर्भातील बैठक घ्या अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे केली. तर मंगळवारी संध्याकाळपर्यंत तहसीलदार कार्यालयाला व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला जर अहवाल पाठवला नाही , तर कृषी विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकणार, असा इशारा आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी दिला. तसेच प्रभारी तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव यांच्या कार्यपद्धतीबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. 

जबाबदारी झटकून देण्याचा प्रयत्न करून तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचा प्रयत्न असे अधिकारी करत असतील तर महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना हीसका दाखवेल, असा इशारा देखील देण्यात आला. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, युवा सेना समन्वयक राजू राठोड, रोहित राणे, जय धुमाळे, संतोष पुजारे, प्रसाद अंधारी, रवी भंडारे आदी उपस्थित होते.

Web Title: The report of the damage in the cyclone was not sent to the higher offices, The delegation of Mahavikas Aghadi revealed a shocking fact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.