सकेंश्वर-बांदा महामार्ग सावंतवाडी शहरातूनच जाणार, बांधकाम विभागाकडून शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 06:31 PM2022-07-05T18:31:06+5:302022-07-05T18:31:30+5:30
अनंत जाधव सावंतवाडी : महाराष्ट्र - कर्नाटकला जोडणारा नवा संकेश्वर-बांदा महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार की बाहेरून याचीच चर्चा सुरू ...
अनंत जाधव
सावंतवाडी : महाराष्ट्र - कर्नाटकला जोडणारा नवा संकेश्वर-बांदा महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार की बाहेरून याचीच चर्चा सुरू होती. पण आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून हा मार्ग सावंतवाडी शहरातूनच जाणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी तसा प्रस्ताव आमच्याकडून गेल्याचे स्पष्ट केल्याने चर्चाना ब्रेक लागणार आहे.
यूपीए सरकारच्या काळात रेडी संकेश्वर महामार्ग अस्तित्वात आला होता. पण केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी संकेश्वर रेडी ऐवजी संकेश्वर-बांदा महामार्ग करण्याचे निश्चित केले. त्यानंतर महामार्ग विभागाकडून सर्वेक्षण ही करण्यात आले. त्यात कर्नाटक मधील संकेश्वर व महाराष्ट्रातील बांदा अशी दोन जंक्शन करण्याचे निश्चित करण्यात आले असून हा नवीन मार्ग संकेश्वर ते बांदा १०३ किलोमीटरचा असणार आहे.
हा मार्ग कर्नाटकातून संकेश्वरवरून येथून सुरू होणार असून, कोल्हापूर जिल्हयातील गडहिंग्लज-आजारा तर सिंधुदुर्ग जिल्हयातील आंबोली-माडखोल-सावंतवाडी-इन्सुली वरून तो महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या बांदा येथे जोडला जाणार आहे. या नव्या महामार्गाची ओळख ही एनएच ४८ म्हणून करण्यात आली असून, तो इन्सुली येथील खामदेव नाका येथे एनएच ६६ ला जोडला जाणार आहे.
दरम्यान या प्रस्तावित रस्त्याचा अद्यादेश ही काढण्यात आला आहे. आंबोली चे प्रवेशद्वार म्हणजेच आजारा फाटया पर्यत या नव्या मार्गाच्या कामाची निर्विदा प्रकिया ही पूर्ण करण्यात आली असून त्या पुढील रस्त्याचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सुरूवातीला हा रस्ता आंबोलीतून उतरल्या नंतर बावळट येथून बांदा येथे जोडला जाईल असे सांगण्यात येत होते.
मात्र, बांधकाम विभागाकडून हा मार्ग सावंतवाडी शहरातूनच जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. आंबोली पासून इन्सुली पर्यत या मार्गाचे चार टप्पे करण्यात आले आहेत. यात आंबोली पासून बावळट तिट्टा पहिला तेथून बुर्डी फूल हा दुसरा टप्पा तर शहरातील गवळी तिट्टा हा तिसरा आणि इन्सुली खामदेव नाका हा चौथा टप्पा असणार आहे. तसा प्रस्ताव ही बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाला हस्तांतरण करण्या ची प्रकिया पुढील वर्षांत सुरू होणार असेही कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी सांगितले.
'लोकमत'ने सर्वात आधी दिले होते वृत्त
सकेंश्वर-बांदा मार्ग सावंतवाडीतूनच जाणार असल्याचे वृत्त सर्व प्रथम 'लोकमत'ने दिले होते. मात्र नंतर काहींनी ही अफवा पसरवत आपल्या पध्दतीने नवनवीन मार्ग निर्माण केले होते. पण मध्यंतरी राष्ट्रीय महामार्ग विभागानेच अद्यादेशासह पत्र जाहीर केले तर बांधकाम विभागाकडून ही हा मार्ग शहरातूनच जाणार यावर शिक्कामोर्तब केल्याने आता अफवांना ब्रेक लागणार आहे.