सिंधुदुर्ग येथील मालपेवाडी येथे पुस्तकाचे गाव, छत्रपती संभाजी नगर, गोंदिया आणि सांगलीमध्येही लवकरच योजनेचा विस्तार

By स्नेहा मोरे | Published: March 11, 2024 07:27 PM2024-03-11T19:27:28+5:302024-03-11T19:27:53+5:30

Sindhudurg Book Village News: भिलार येथील ‘पुस्तकांचे गाव’ योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा विस्तार करण्यात येत असून सिंधुदुर्गच्या मालपेवाडीतील पोंभुर्ले गावात या योजनेचा आरंभ करण्यात आला आहे. येत्या काळात ही योजना राज्यभरात टप्याटप्प्याने विस्तारण्यात येणार आहे.

The scheme will soon be expanded to Malpewadi in Sindhudurg, Book Village, Chhatrapati Sambhaji Nagar, Gondia and Sangli. | सिंधुदुर्ग येथील मालपेवाडी येथे पुस्तकाचे गाव, छत्रपती संभाजी नगर, गोंदिया आणि सांगलीमध्येही लवकरच योजनेचा विस्तार

सिंधुदुर्ग येथील मालपेवाडी येथे पुस्तकाचे गाव, छत्रपती संभाजी नगर, गोंदिया आणि सांगलीमध्येही लवकरच योजनेचा विस्तार

मुंबई - भिलार येथील ‘पुस्तकांचे गाव’ योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा विस्तार करण्यात येत असून सिंधुदुर्गच्या मालपेवाडीतील पोंभुर्ले गावात या योजनेचा आरंभ करण्यात आला आहे. येत्या काळात ही योजना राज्यभरात टप्याटप्प्याने विस्तारण्यात येणार आहे.

नुकत्याच शासनाच्या झालेल्या बैठकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ, गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध आणि सांगली जिल्ह्यातील अंकलखोप (औदुंबर) येथे पुस्तकाचे गाव योजनेच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. पुस्तकांच्या गावांना परदेशी पर्यटकही भेट देतील हे लक्षात घेऊन आणि त्यांच्यापर्यंत मराठी साहित्य पोहोचावे यासाठी महत्त्वाच्या मराठी पुस्तकांच्या इंग्रजी अनुवादांची श्राव्य पुस्तके उपलब्ध करून द्यावीत, अशी सूचना शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. मालपेवाडी येथे प्रातिनिधीक स्वरूपात मालपे ॲग्रो टुरिझम यांच्या कार्यालयात पुस्तक दालन तयार करण्यात आले असून पुढील काळात गावातील अन्य ठिकाणीही पुस्तकांची दालने सुरू करण्यात येणार आहेत. इंग्लंड वेल्स मधील ‘हे ऑन वे’ यापुस्तकाच्या गावाच्या धर्तीवरील संकल्पनेनुसार राज्यात साकारलेल्या ‘पुस्तकांचे गाव’ योजनेचा विस्तार करण्यात येत आहे.

मालपेवाडी येथील दालनाच्या उद्घाटन प्रसंगी माणुसकी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद मालपेकर, संस्थेच्या नियामक मंडळाच्या आणि या प्रकल्पाच्या पुस्तक निवड समितीच्या सदस्य रेखा दिघे, देवगडचे तहसीलदार जनार्दन साहिले, पोंभुर्ले येथील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आप्पा बेलवलकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

पुस्तक निवड समितीची नियुक्ती
वाचकांना दर्जेदार पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी राज्य मराठी विकास संस्थेद्वारे साहित्याचे जाणकार आणि तज्ज्ञ वाचक यांची पुस्तक निवड समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीद्वारे पुस्तकांची निवड करण्यात येऊन विविध साहित्य प्रकारांनुसार तसेच सर्वकाळ लोकप्रिय असणारी पुस्तके या दालनांमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मराठी साहित्याचे वाचक व अभ्यासक या ग्रंथदालनाचा लाभ घेऊ शकतील, अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ.शामकांत देवरे यांनी दिली.

Web Title: The scheme will soon be expanded to Malpewadi in Sindhudurg, Book Village, Chhatrapati Sambhaji Nagar, Gondia and Sangli.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.