पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्गमध्येच होणार, पालकमंत्री रविंद्र चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: January 2, 2024 06:59 PM2024-01-02T18:59:42+5:302024-01-02T19:01:50+5:30
'राजकीय स्वार्थासाठी विरोधक गैरसमज पसरवतायत'
संदीप बोडवे
मालवण: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित पाणबुडी प्रकल्प हा जिल्ह्याच्या पर्यटन व विकासाला चालना देणारा प्रकल्प असून हा आमच्या शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. तसेच नियोजनानुसार कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प वेंगुर्ला येथूनच कार्यान्वित होणार आहे. मात्र आपल्या राजकीय स्वार्थासाठी विरोधक या प्रकल्पाबाबत जाणूनबुजून गैरसमज पसरवत असल्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. पाणबुडी प्रकल्पासंदर्भात आज मंत्रालयात पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची बैठक झाली.
या बैठकीत प्रस्तावित पाणबुडी प्रकल्पाची सद्यस्थिती व वस्तुस्थिती जाणून घेतली. या प्रकल्पासाठी आवश्यक निधीसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. पाणबुडी पर्यटन विकासासाठी मंजूर निधीपैकी काही निधी हा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे(एमटीडीसीकडे) वर्ग करण्यात आला आहे. या प्रस्तावित प्रकल्पासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही व सदर प्रकल्प सकारात्मक पूर्ण होण्याच्या दृष्टीने विभागाने तातडीने प्रयत्न करावेत असे निर्देश यावेळी उपस्थितांना दिले.
या बैठकीला पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी- शर्मा यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे हे व्हर्च्युअल माध्यमातून उपस्थित होते.
लोकमत'ने प्रकल्प रखडल्याने सर्वप्रथम फोडली वाचा
राजकीय अनास्थेपोटी सिंधुदुर्गातील पाणबुडीसह अनेक प्रकल्प रखडले आहेत. या महत्त्वपूर्ण विषयाला दि. २८ डिसेंबर रोजी दैनिक लोकमत मधून सर्वप्रथम वाचा फोडण्यात आली होती. लोकमतच्या या वृत्तानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते. या लेखात पालक मंत्री रवींद्र चव्हाण हे धडाडीचे निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी पाणबुडी प्रकल्पात लक्ष घातले तरच हा प्रकल्प पुढे जावू शकतो, असे म्हटले होते. अखेर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या प्रकल्पात लक्ष घातले असून सिंधुदुर्गातील जनतेला आश्वस्त केले आहे.