सावंतवाडीत आलेल्या आनंदाच्या शिध्यातील साखरेत घोळ, माजी नगरसेवकांकडून पुराव्यासह उघड
By अनंत खं.जाधव | Published: March 24, 2023 06:01 PM2023-03-24T18:01:38+5:302023-03-24T18:03:03+5:30
सावंतवाडी : शासनाकडून सावंतवाडी तालुक्यासाठी पाठविण्यात आलेल्या आनंदाच्या शिध्यातील साखरेत एक-दोन नव्हे, तर तब्बल एक टनाचा घोळ झाला आहे. ...
सावंतवाडी : शासनाकडून सावंतवाडी तालुक्यासाठी पाठविण्यात आलेल्या आनंदाच्या शिध्यातील साखरेत एक-दोन नव्हे, तर तब्बल एक टनाचा घोळ झाला आहे. माजी नगरसेवकांकडून हा घोळ उघड करण्यात आला.
साखरेचा ट्रक पुन्हा माघारी पाठवण्यात आला आहे. दरम्यान या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवकांकडून करण्यात आली आहे. सुरेश भोगटे यांच्यासह उमाकांत वारंग व विलास जाधव यांनी तहसीलदार अरुण उंडे यांची भेट घेत पुराव्यासह हा प्रकार निर्दशनास आणून दिला.
मंगळवार दि. २१ मार्चला सकाळी आनंदाच्या शिद्यातील २५ टन साखरेची पॅकेट असलेला ट्रक सावंतवाडी गोदामात दाखल झाला. यावेळी त्याची मोजणी केली असता प्रत्येक पॅकेटमध्ये किलोमागे २०० ते ३०० ग्रॅमची तूट मिळाली. त्यामुळे तेथील पुरवठा व्यवस्थापकांनी तो ट्रक साखर न स्वीकारता माघारी पाठवला. दरम्यान या ठिकाणी आलेला ट्रक एकाएकी माघारी का गेला? अशी शहरात चर्चा रंगली होती.
यावेळी माजी नगरसेवकांकडून याबाबत पाठपुरावा करण्यात आला. तसेच यासंदर्भात छुप्या पद्धतीने माहिती घेण्यात आली असता साखरेत घोटाळा असल्याचे उघड झाले. त्यानुसार दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हा पुरवठा विभागाकडे केली.
तर या संदर्भात आज तहसीलदारांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधत योग्य ती पावले उचलली जावीत, आणि धान्य पुरवठा विभागात अन्य मार्गानेही असा घोटाळा होतो का? याची तपासणी करावी, अशी मागणी केली. यापूर्वी ही अनेक वेळा अशाच तक्रारी करण्यात आल्या आहेत. तहसिलदार म्हणून आपण धान्याची तपासणी करावी अशी मागणी करण्यात आली.