राजापूरमधील 'त्या' वक्तव्याचा शिंदे गटाकडून निषेध; नरेंद्र जोशींचा प्रतिकात्मक पुतळा जाळला
By सुधीर राणे | Published: September 12, 2022 05:41 PM2022-09-12T17:41:15+5:302022-09-12T17:43:18+5:30
नाना पटोले यांच्या राजापूर दौऱ्यात रिफायनरी विरोधक जोशी यांनी मंत्री उदय सामंत यांना जाळून मारण्याच्या अनुषंगाने वक्तव्य केले होते
कणकवली - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजापूर दौऱ्यात रिफायनरी विरोधक नरेंद्र जोशी नामक व्यक्तीने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. शिवसेनेच्यावतीने आम्ही याचा निषेध करतो. यापुढे असे वक्तव्य केल्यास त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेना शिंदे गटाच्यावतीने कणकवली येथे देण्यात आला. यावेळी जोशी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले.
नाना पटोले यांच्या राजापूर दौऱ्यात रिफायनरी विरोधक जोशी यांनी मंत्री उदय सामंत यांना जाळून मारण्याच्या अनुषंगाने वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा जिल्हापरिषदेचे माजी सभापती संदेश सावंत-पटेल यांनी सोमवारी कणकवली येथील मध्यवर्ती कार्यालयात निषेध केला. यावेळी सुनील पारकर, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, शेखर राणे, दामू सावंत, बाळू पारकर, दिलीप घाडीगावकर, प्रमोद सांगवेकर, दीपक राऊत, सुनील हरमलकर आदी उपस्थित होते. उदय सामंत यांना अशी धमकी देण्याचे सोडा, पण वाकड्या नजरेने जरी कोणी बघितले तरी त्याला योग्य उत्तर देऊ, असा इशारा यावेळी देण्यात आला.