नगराध्यक्षांसह कणकवली नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल उद्या संपणार, समारोपाच्या सभेत सर्वजण झाले भावूक

By सुधीर राणे | Published: May 4, 2023 04:06 PM2023-05-04T16:06:28+5:302023-05-04T16:07:07+5:30

कणकवली नगरपंचायतीवर प्रशासकीय राजवट लागणार

The term of office bearers of Kankavali Nagar Panchayat including the Mayor will end tomorrow | नगराध्यक्षांसह कणकवली नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल उद्या संपणार, समारोपाच्या सभेत सर्वजण झाले भावूक

नगराध्यक्षांसह कणकवली नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल उद्या संपणार, समारोपाच्या सभेत सर्वजण झाले भावूक

googlenewsNext

कणकवली: कणकवली नगरपंचायतीमधील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाल ५ मे रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी नगरपंचायतीच्या प.पू.भालचंद्र महाराज सभागृहात विशेष सभा झाली. समारोपाच्या या सभेत सर्वच नगरसेवकांबरोबरच नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षही भावूक झाले. गत आठवणींना उजाळा देताना नगराध्यक्ष समीर नलावडे यांना अश्रू अनावर झाले. उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत घडलेल्या काही घटना तसेच कटू प्रसंगांबद्दल एकमेकांची माफी मागितली.तसेच दिलगिरीही व्यक्त केली. 

मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या उपस्थितीत ही सभा झाली. यावेळी मनोगत व्यक्त करताना कणकवलीच्या विकासासाठी जनतेने ठरविले तर नगरपंचायत मध्ये 'मी पुन्हा येईन' असे उदगार नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी काढले. सर्वांच्या सहकार्यामुळेच चांगले काम करून जनतेचे प्रश्न सोडवत नगराध्यक्ष पदाला आपण न्याय  देवू शकलो. आजचा आनंदाचा आणि दुःखाचाही दिवस आहे. यापुढे निवडणुका येतील  आणि जातीलही. मात्र, जनसेवा करण्यासाठी आपण यापुढेही तत्पर राहणार आहोत. आता खुर्चीवरून पाय उतार होत असलो तरी पुढील निवडणूक होईपर्यंत प्रशासकीय राजवट लागणार असून शहराचे काय होईल? याची चिंता वाटते. 

गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत  ५० कोटी ६० लाखांचा निधी आम्ही शहरासाठी आणला. राज्यात आमची सत्ता नसतानाही तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी आम्हाला मदत केली. आमदार वैभव नाईक माझे मित्र आहेत त्यांनीही मदत केली.अशी अनेकांची मदत आम्हाला लाभली आहे.

कोविड काळात अगदी जीवावर उदार होऊन कणकवलीत विविध उपक्रम राबविले. वैशिष्ट्यपूर्ण कामामुळे कणकवली नगरपंचायतीचा राज्यात प्रथम क्रमांक आला. विरोधी नगरसेवकांबरोबर मतभेद होते. पण मनभेद कधीही ठेवला नाही. त्यामुळे त्यांच्या प्रभागातील विकासकामेही केली असेही ते म्हणाले.

अबीद नाईक म्हणाले, राजकारणापेक्षा समाजकारण करण्याकडे माझा कल राहिला आहे.  समीर नलावडे यांनी जबरदस्तीने मला नगरसेवक पदाच्या निवडणुकीला उभे केले. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत असतानाच नगरसेवक पदाच्या माध्यमातून जनसेवेला प्राधान्य दिले. यावेळी मुख्याधिकारी अवधूत तावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेविका मेघा सावंत, मेघा गांगण, शिशिर परुळेकर, कविता राणे, प्रतीक्षा सावंत, अभिजित मुसळे, विराज भोसले, संजय कामतेकर, कन्हैया पारकर, सुशांत नाईक आदी नगरसेवकांनीही मनोगत व्यक्त केले.
 
विरोधी नगरसेवक स्ट्रॉंग असल्यानेच चांगली कामे!

कणकवली नगरपंचायत मध्ये विरोधी नगरसेवकांची जबाबदारी आम्ही पूर्ण क्षमतेने निभावली आहे.विरोधी नगरसेवक स्ट्रॉंग असल्यानेच शहरात चांगली कामे झाली आहेत. मात्र, जुन्या भाजीमार्केट जवळील स्वच्छता गृहासाठी ८६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ते कशासाठी? याचे उत्तर जनतेला मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ए.जी.डॉटर्सचा प्रकल्प,शहराचा डीपी प्लॅन याबाबतही पुढे काय झाले?ते जनतेला सत्ताधाऱ्यानी सांगावे.असे यावेळी सुशांत नाईक म्हणाले.तर कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर यांनी या मुद्द्यांना दुजोरा दिला. 

तुम्ही कायम विरोधकच राहा!

शहरात झालेली विकासकामे ही तुम्ही सक्षम विरोधक असल्यानेच चांगली झाली,असे तुमचे म्हणणे आहे. तसे असेल तर पुढील कालावधीतही तुम्ही नगरपंचायतीत विरोधकच राहा.असा टोला उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी विरोधी नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर यांना लगावला.

Web Title: The term of office bearers of Kankavali Nagar Panchayat including the Mayor will end tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.