Sindhudurg: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट येथील पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: December 4, 2023 05:09 PM2023-12-04T17:09:39+5:302023-12-04T17:17:27+5:30
सिंधुदुर्ग :भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी ४ डिसेंबरला साजरा होणारा नाैदल दिन यावर्षी जिल्ह्यात ...
सिंधुदुर्ग :भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी ४ डिसेंबरला साजरा होणारा नाैदल दिन यावर्षी जिल्ह्यात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने साजरा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली १७ व्या शतकात बांधलेला हा किल्ला महाराजांचे आरमार आणि सागर सुरक्षेस दिलेल्या प्राधान्यातून निर्माण झालेला आहे. नाैदल दिनानिमित्त राजकोट किल्ल्यावर भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचा ४५ फुट उंच भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी ४.१५ वाजता करण्यात आले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.
नाैदलाचे शक्तीप्रदर्शन, मान्यवरांची उपस्थिती
सिंधुदुर्गच्या समुद्रात भारतीय नाैदलाच्या सामर्थ्याचे शक्तीप्रदर्शनही करण्यात आले. जगात चाैथ्या क्रमांकाची बलाढ्य नाैसेना म्हणून ओळखल्या जाणार्या भारतीय नाैसेनेच्या या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान सभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्ह, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आदी सहभागी झाले.
जनसागर लोटला
नाैसेना दिनासाठी तारकर्ली समुद्रकिनारी अशरक्ष: जनसागर लोटला आहे. सकाळपासूनच जिल्हाभरातील नागरिक एसटी बसेसमधून कार्यक्रम स्थळी दाखल होते. तारकर्ली समुद्रकिनारी दोन भव्य मंडप उभारण्यात आले होते. तेथे उपस्थितांसाठी अल्पोपहार आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.
पालकमंत्र्यांनी घेतला दुचाकीवरून आढावा
नाैसेना दिनानिमित्त तारकर्ली समुद्रकिनारी सोमवारी सकाळपासूनच जिल्हावासीय मोठ्या संख्येने दाखल होत होते. मालवणबाहेरील लोकांसाठी २६६ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी दाखल होणार्या लोकांची खाण्यापिण्याची व्यवस्था तसेच वाहनतळ नियोजनाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दुचाकीवरून दांडी ते तारकर्लीपयर्यंतच्या किनार्यावर प्रवास केला.
समुद्रकिनारी १०० जीवरक्षक
नाैसेना दिनासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहणार असल्याने तारकर्ली ते दांडीपर्यंतच्या समुद्रकिनारी जवळपास १०० जीवरक्षक तैनात करण्यात आले होते.
२० युद्धनाैकांचा समावेश
या कार्यक्रमात मिग २९ के आणि एलसीए नाैदलाचा समावेश असलेल्या ४० विमानांसह २० युद्धनाैकांनी यात सहभाग घेतला होता. भारतीय नाैदलाच्या मरिन कमांडोव्दारे भर समुद्र तसेच किनार्यावरील शोध आणि बचाव कार्य तसेच क्षत्रूवर प्राणघातक हल्ल्याचे प्रात्यक्षिक प्रमुख आकर्षण होते.
लेझर शो ने समारोप
इतर प्रमुख आकर्षणामध्ये नाैदल बँडचे प्रदर्शन, एनसीसी कॅडेटसचे सातत्यपूर्ण ड्रिल आणि हाॅर्न पाइप नृत्य यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचा समारोप लंगरवरील जहाजांना रोषणाई करून त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्यावर लेझर शो व्दारे करण्यात आला.