Shivaji Maharaj Statue Collapse: कार्यक्रम नौदलाचा, मग खर्च ‘जिल्हा नियोजन’मधून का ?; वैभव नाईकांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 12:52 PM2024-09-23T12:52:00+5:302024-09-23T12:54:13+5:30
कुडाळ : मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा कार्यक्रम नौदलाचा होता. मग झालेला साडेपाच कोटींचा खर्च ...
कुडाळ : मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा कार्यक्रम नौदलाचा होता. मग झालेला साडेपाच कोटींचा खर्च ‘जिल्हा नियोजन’मधून का करण्यात आला? असा सवाल उद्धवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला. या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असून, त्या ठिकाणी मिळालेले पैसे लोकसभा निवडणुकीत मतदारांना वाटण्यात आले, असा आरोप नाईक यांनी केला. ते कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी आमदार नाईक म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भ्रष्टाचारानंतर अनेक गोष्टी आता उघड होऊ लागल्या आहेत. खरेतर मूर्तिकार आपटे याला २६ लाख रुपये आतापर्यंत पोहोच झाले आहेत, अशी माहिती पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्यानंतर या पुतळ्याच्या कामामध्येसुद्धा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे.
परंतु राजकोट येथील पुतळा अनावरण आणि नौसेना दिनाच्या कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजनमधून ५ कोटी ५४ लाख ३५ हजार रुपये खर्च झाले आहेत. त्यामध्ये हेलिकॉप्टर इंधन, डीव्ही कार, शासकीय वाहने यांचे इंधन यासाठी ३७ लाख ९० हजार, मान्यवर निवास व्यवस्था आणि भोजन व्यवस्था २५ लाख ५० हजार, मंडप २ कोटी, बॅरिकेटिंग दीड कोटी, इंटरनेट, पाणीपुरवठा, ओळखपत्र छपाई यासाठी १८ लाख ५० हजार आणि जिल्ह्याबाहेरून येणारे पोलिस, अधिकारी, कर्मचारी यांचे निवास आणि भोजन यासाठी १ कोटी २२ लाख ४५ हजार, असे एकूण ५ कोटी ५४ लाख ३५ हजार रुपये जिल्हा नियोजनमधून खर्च झाल्याचा तपशील आमदार वैभव नाईक यांनी यावेळी सादर केला.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, नगरसेवक उदय मांजरेकर, माजी नगरसेवक सचिन काळप, माजी उपसभापती जयभारत पालव, बबन बोभाटे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पुतळा प्रकरणात नौसेना गप्प
यावेळी नाईक पुढे म्हणाले, आमच्या माहिती प्रमाणे हे पैसे जिल्हा नियोजन आणि नौदल या दोघांकडूनही खर्च झाले आहेत. कारण नौसेना कोणत्याच विषयावर काहीच बोलत नाही. पुतळा प्रकरणात नौसेना गप्प आहे. २६ लाख रुपये शिल्पकार जयदीप आपटे याला मिळाल्याचा आमचा आरोप आहे. त्यावरसुद्धा नौसेना काहीच बोलत नाही. त्यामुळे नौसेना कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजनमधून पैसे खर्च करण्यात आले आहेत आणि हे पैसे नौसेनेसुद्धा खर्च केले आहेत. मग एकाच कामावर दोघांकडून खर्च का? असा सवाल वैभव नाईक यांनी उपस्थित केला.
लवकरच पर्दाफाश
जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे पैसे खर्च केले. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत असून, त्याची प्रक्रिया सुरू आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार आहे. तसेच हे अधिकारी, पालकमंत्री यांनी अंदाधुंद कारभार केला आहे. त्याचा पर्दाफाश लवकरच होईल, असे नाईक यांनी सांगितले.