Sindhudurg News: सावंतवाडीकरांसमोर नवं संकट, अनेक विहिरींचे पाणी कमी होऊ लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 04:15 PM2023-01-12T16:15:56+5:302023-01-12T16:16:27+5:30
नगरपालिका दुहेरी संकटात
सावंतवाडी : मोती तलावातील गाळ काढताना संरक्षक कठड्याला धोका पोचल्याने तो कठडा भरपावसात कोसळला त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले खरे; पण आता सावंतवाडीकरांसमोर वेगळेच संकट उभे ठाकण्याची शक्यता आहे.
अनेकांच्या मते ऐन जानेवारीच्या तोंडावर तलावातील पाणी सोडून देण्यात आल्याने तलावाच्या आजूबाजूच्या परिसरातील विहिरी आटण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून काही विहिरीचे पाणी ही कमी होऊ लागले आहे.
सावंतवाडी मोती तलावातील गाळ गेल्या वर्षी काढण्यात आला हा गाळ काढत असताना गाळ काढण्यासाठी आणलेल्या पोकलॅड मशीन तलावाच्या फुटपाथवर ठेवण्यात आले होते. त्यावेळी या फुटपाथला धोका निर्माण झाला आणि ऐन पावसाळ्यात हा फुटपाथ तसेच संरक्षक कठडा कोसळला असून जुन्या मुंबई गोवा महामार्गाला ही धोका पोचला आहे. हा धोका वाढत जाणार असे वाटत असल्याने या फुटपाथ तसेच संरक्षक कठड्याचे काम तातडीने व्हावे म्हणून अनेकांनी आंदोलने केली होती
या आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने या साठी प्रयत्न करत 1 कोटी 12 लाख रूपयांचा निधी ही मंजूर करण्यात आला आहे. तसेच त्याचे भूमिपूजन ही अलिकडेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पार पडले.त्यामुळे या कामाची सुरुवात होणार हे आता निश्चित झाले आहे.त्यासाठी तलावातील पाणी ही सोडून देण्यात आले आहे. कारण पाणी सोडले नाही तर कामही करता येणार अशा दुहेरी संकटात नगरपालिका आहे.
शहरातील विहिरींना धोका
पाणी सोडून देण्यात आल्याने सावंतवाडीकरांसमोर संकट उभे राहण्याची शक्यता नाकारता ही येत नाही कारण जानेवारीच्या सुरुवातीलाच पाणी सोडल्याने अनेक विहिरींचे पाणी आटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तलावातील पाणी हे मे च्या अखेरपर्यंत कमी होत असते त्यावेळी शहरातील अनेक विहिरी या कोरड्या पडतात मात्र आता जानेवारीच्या सुरुवातीलाच पाणी सोडून देण्यात आल्याने शहरातील विहिरीना धोका निर्माण झाला आहे.
प्रशासनावर आला दबाव
यामुळे शहरात पाणी टंचाई भासण्याची शक्यता जास्त आहे.काहि च्या मते हे काम मे महिन्यात सुरू करणे संयुक्तिक होते.शहर वासियाच्या पाण्याचा प्रश्न मिटला असता आणि काम ही झाले असते पण सर्वपक्षीयाची आंदोलने आणि प्रशासनावर असलेला दबाव यामुळे काम घाईगडबडीत सुरू केले असले तरी ते लवकरात लवकर संपवले नाही.सावंतवाडीवासियाच्या उग्र प्रतिकिया येण्यास वेळ लागणार नाही