मोती तलावातील पाणी सोडले, मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत; परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 09:05 AM2023-05-30T09:05:34+5:302023-05-30T09:09:15+5:30
तलावातील संरक्षक भिंत बांधण्यासाठी तलावातील पाणी सोडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत झाला आहे. यामुळे मोठ्याप्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.
सावंतवाडी : शहरातील सावंतवाडी-बांदा महामार्गाच्या बाजूने मोती तलावाच्या दोन संरक्षक भिंतींचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. सुमारे ७० लाखाची ही दोन कामे आहेत. सावंतवाडी दिवाणी न्यायालयाच्या बाजूला १५ मीटर तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर १६ मीटर संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे.तर तलावातील संरक्षक भिंत बांधण्यासाठी तलावातील पाणी सोडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत झाला आहे. यामुळे मोठ्याप्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.
सावंतवाडी शहरात मोती तलावातील गाळ काढण्यासाठी गतवर्षी डोजर लावण्यात आला होता. त्यावेळी उपजिल्हा रुग्णालयाजवळील मोती तलावाची संरक्षक भिंत कोसळली होती. ही भिंत एक कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आली आहे. सावंतवाडी दिवाणी न्यायालयाच्या बाजूला मोती तलावाची संरक्षक भिंत ढासळत होती. हीच परिस्थिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरील भिंतीबाबत होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने या दोन्ही ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे ठरविले. त्यानुसार १५ आणि १६ मीटर अशा दोन ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्यात येत आहेत. त्यासाठी ७० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. रविवारपासून संरक्षक भिंतीचे काम हाती घेण्यात आले आहे.
जेसीबी लावून त्यासाठी रस्ता तलावात करण्यात येत आहे. दोन्ही संरक्षक भिंती झाल्यानंतर तलावाकाठच्या संरक्षक भिंती मजबूत होतील. परंतु वारंवार तोडफोड होत असल्यामुळे मोती तलावाच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे.तर दुसरी कडे गाळ काढण्यासाठी आणलेला डोजर दोन दिवस उभा आहे. या डोजरने मार्ग बनविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु मार्ग बनविणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे डोजर उभा आहे. यातून आता गाळ काढण्याचे काम यंदा होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.चार दिवसानंतर ही तलावात आता डोजर उतरण्याचेच काम करण्यात येत आहे.
पाणी सोडल्याने मासे मृत परिसरात दुर्गंधी
बांधकाम करण्यासाठी मोती तलावातील पाणी सोडण्यात आले आहे.त्यामुळे तलावातील मासे मृत पावले असून परिसरात एकच दुर्गंधी पसरली आहे. अनेकानी याबाबत सावंतवाडी नगरपरिषद कडे तक्रारी केल्या आहेत तलावाच्या परिसरातून ये जा करणाऱ्या ना नाकाला रुमाल लावून जावे लागते.