मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला गती येणार; झाराप, इन्सुली पुलासाठी ६८ तर व्हाईट टॉपींगसाठी ३८ कोटी मंजूर

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 30, 2023 04:38 PM2023-05-30T16:38:00+5:302023-05-30T16:38:22+5:30

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्नशील असून, अनेक ठिकाणी ब्लॅक स्पॅाट आहेत. त्यासाठी अपघातांचे प्रमाण ...

The work of Mumbai-Goa highway will speed up, 68 crore for Zarap, Insuli bridge and 38 crore for white topping | मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला गती येणार; झाराप, इन्सुली पुलासाठी ६८ तर व्हाईट टॉपींगसाठी ३८ कोटी मंजूर

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला गती येणार; झाराप, इन्सुली पुलासाठी ६८ तर व्हाईट टॉपींगसाठी ३८ कोटी मंजूर

googlenewsNext

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्नशील असून, अनेक ठिकाणी ब्लॅक स्पॅाट आहेत. त्यासाठी अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी इन्सुली आणि झाराप या दोन ठिकाणी होणाऱ्या पुलांसाठी ६८ कोटींना तसेच जुन्या रस्त्यावरील व्हाईट टॉपींगसाठी ३८ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. आंबोली - रेडी रस्ता क्रॉंक्रीटीकरण करण्याचा प्रस्तावही पाठवला असून, तोही लवकरच मार्गी लावला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.

पालकमंत्री  चव्हाण यांनी झाराप येथून मुंबई - गोवा महामार्गाची पाहणी करण्यास आज सुरुवात केली. यावेळी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, माजी आमदार राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.

या पाहणीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. पत्रादेवी ते झाराप आणि सावंतवाडीकडून येणारा रस्ता यामुळे झाराप तिठ्यावर अपघात होत होते. या ठिकाणी  तसेच इन्सुली येथे पुलाच्या कामास मंजुरी देण्यात आली असून लवकरच ते पूर्ण होईल, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, हा संपूर्ण रस्ता पूर्वी झालेला आहे. त्यासाठी व्हाईट टॉपींग करण्यासाठीही मंजुरी देण्यात आलेली आहे. मुंबई ते गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असून लोकप्रतीनिधींचे सहकार्य, अधिकारी कंत्राटदार यांचीही मेहनत असल्याचेही ते म्हणाले. 

कुडाळ येथील आरएसएन हॉटेल नजिक होणारे अपघात रोखण्यासाठी, कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची लोकप्रतिनिधींची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. या ठिकाणची पालकमंत्री चव्हाण यांनी पाहणी करुन, त्यांनी तेथे आयलॅंड करण्याचे निर्देश यावेळी दिले. वेताळबांबार्डे येथील प्रलंबित भूसंपादनाचे प्रस्ताव आठवड्याभरात पूर्ण करण्याचे आदेशही प्रांताधिकाऱ्यांना त्यांनी दिले. 

कणकवली - वागदे फाटा येथे पाहणी करुन पालकमंत्री चव्हाण म्हणाले, हा ब्लॅकस्पॉट आहे. या ठिकाणी अपघात झाले आहेत. हे अपघात रोखण्यासाठी येथे मोठे आरसे लावा त्याचबरोबर नव्याने काही बदल करणे आवश्यक असेल तर ते करा. त्यासाठी नवीन प्रस्ताव करण्यासाठी हरकत नाही, पण ठोस उपाययोजना करा.

यावेळी आमदार नितेश राणे, संदेश पारकर हे ही उपस्थित होते. खारेपाटणपर्यंत पालकमंत्री चव्हाण यांनी पाहणी करत  एन एच आय च्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या पाहणी दौऱ्यादरम्यान  ठिक-ठिकाणी ग्रामस्थ पालकमंत्र्यांना भेटून निवेदने देत होते. ते स्वीकारुन पालकमंत्र्यांनी त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Web Title: The work of Mumbai-Goa highway will speed up, 68 crore for Zarap, Insuli bridge and 38 crore for white topping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.