राष्ट्रीयकृत बँकांचे काम समाधानकारक नाही, नरेंद्र पाटलांची नाराजी
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 27, 2023 06:28 PM2023-04-27T18:28:56+5:302023-04-27T18:29:28+5:30
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या योजनेंतर्गत तरुणांना कर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करत आहेत
सिंधुदुर्ग : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या योजनेंतर्गत मराठा तरुण उद्योग व्यवसाय करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१५ लाभार्थ्यांना १६ कोटींचे विविध बँकेमार्फत कर्ज देण्यात आले आहे. तसेच या योजनेंतर्गत १ कोटी ४४ लाखांचे व्याज परतावाही देण्यात आला आहे. अशी माहिती देतानाच या योजनेत राष्ट्रीयकृत बँकांकडून जिल्ह्यात अपेक्षित असे काम केले जात नसल्याची नाराजी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. तसेच या योजनेत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे काम समाधानकारक असल्याचे गौरोदगारही काढले.
जिल्ह्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या योजना ग्रामीण भागातील मराठा तरुणापर्यंत पोहोचाव्यात आणि त्यासाठी काम करणारे प्रशासन अधिकारी बँक अधिकारी यांच्या समिती एकत्र बैठक व्हावी आणी ती बैठक स्वत: अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सिंधुदुर्गात येउन घ्यावी असे आग्रहाचे निमंत्रण आमदार नितेश राणे यांनी दिले होते. त्यानुसार गुरूवारी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन या योजनेचा आढावा घेतला. त्यांनतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर आदी उपस्थित होते.
यावेळी नरेंद्र पाटील म्हणाले की, मराठा तरुण तसेच अर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या होतकरूंना महामंडळच्यावतीने दिल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ कशा पद्धतीने मिळतो याचा आपण आढावा घेतला. या महामंडळाच्या योजनांमध्ये राष्ट्रीयकृत बँकांचे काम समाधानकारक नसल्याचे दिसून आले आहे. ज्या ठिकाणी ४ हजार लाभार्थी तयार होणे अपेक्षित होते तेथे केवळ २१५ लाभार्थी आहेत. यातील १८० हे एका जिल्हा बँकेचे आहेत. या बँकेने तब्बल ९ कोटी ५० लाख एवढ्या कर्जाचे वाटप केले आहे. तर उर्वरित लाभार्थ्यांना इतर बँकांनी कर्ज पुरवठा केला आहे. मराठा समाजाला आणि आर्थिक दुर्बल घटकाला कर्ज देण्यात जिल्हा बँकेचा मोठा वाटा आहे.
राष्ट्रीय बँकांना सुतावर आणण्यासाठी राज्यस्तरीय बैठक घेणार
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या योजनेंतर्गत तरुणांना कर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करत आहेत. त्यांच्या कामात सुधारणा होत नाहीत. त्यामुळे या बँकांना सूतावर आणण्यासाठी वित्त मंत्री, लीड बँकेचे मॅनेजर आदिंसमवेत राज्यस्तरीय बैठक घेतली जाणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
जमिनी विकू नका पर्यटन दृष्टी विकसित करा
येथील नागरिकांनी आपल्या जमिनी विक्री करू नयेत. त्या ऐवजी आपल्या जमिनीत पर्यटन दृष्ट्या विकसित करून पर्यटक आपल्याकडे कसे येतील यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन करतानाच पर्यटनदृष्टया व्यवसाय करण्यासाठीही या मंडळामार्फत आर्थिक साहाय्य केले जाणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.