नौसेना दिन: शिव पुतळा उभारणीचे काम पूर्ण, राजकोट किल्ल्याला गतवैभव प्राप्त होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 12:01 PM2023-11-30T12:01:56+5:302023-11-30T12:02:30+5:30
मालवणात ४ डिसेंबरला साजऱ्या होणाऱ्या नौसेना दिन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार
मालवण: मालवणात ४ डिसेंबरला साजऱ्या होणाऱ्या नौसेना दिन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त सार्वजनिक बांधकाम व नौसेना विभागामार्फत राजकोट-सर्जेकोट येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे काम पूर्ण झाले आहे.
किल्ले सिंधुदुर्गकडे तोंड करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या कामाची पाहणी बांधकाम विभागाचे राज्य सचिव सदाशिव साळुंखे यांनी करून बांधकाम विभागाचे कणकवली येथील कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड आणि टिमचे त्यांनी भरभरून कौतुक केले.
राजकोट किल्ल्याचे अवशेष आता दिसत नाहीत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने राजकोट किल्ल्यावरील मोकळ्या जागेत नव्याने किल्ल्याचे बांधकाम केले आहे. आहे. ऐतिहासिक राजकोट किल्ल्याची पुनर्बाधणी करताना निश्चित कालावधीत काम पूर्ण केल्याबद्दल साळुंखे यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी महसूल विभागासह अन्य सर्व प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत किल्ल्याचा आराखडा तयार करणे, त्याला मंजुरी घेणे, त्याच्या निविदा प्रक्रिया राबविणे व बांधकाम करून घेणे ही कामे अवघ्या दोनच महिन्यात पूर्ण झाली आहेत.
इतक्या जलद गतीने अणि उत्कृष्टपणे राजकोट किल्ल्याचे काम होत असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीत व राजकोट किल्ला पुनर्बाधकामात सिंहाचा वाटा आहे. राजकोट येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या किल्ल्यावर युद्धाच्या आवेशात असलेल्या छ. शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर रोजी होणार आहे.
अधिकाऱ्यांचे कौतुक!
अभियंत्यांनी जनमानसात प्रतिमा सुधारण्याची हीच वेळ आहे, असे सचिव साळुंखे यांनी यावेळी सांगितले. सर्वगोड म्हणाले, अतिशय शांत वृत्तीचे, बुद्धिमान, सर्व विषय बारकाईने समजून घेणारे, मोजकेच अणि वस्तुनिष्ठ बोलणारे, कोणताही वाह्यात हेतू न ठेवता, खात्याची अणि स्वतःची जपणारे असे साळुंखे हे अधिकारी आहेत.
२ डिसेंबरला संपूर्ण परिसर सुरक्षा यंत्रणेच्या ताब्यात देणार
नौसेनेकडून राजकोट किल्ल्याची जागा निश्चित करण्यात आल्यानंतर महसूल विभागाकडून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून ही जागा बांधकाम विभागाच्या ताब्यात देण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव सादर केला. त्यानंतर बांधकाम विभागाने नौसेनेकडून आलेल्या सूचनांनुसार राजकोट किल्ल्याची पुनर्रभारणी केली आहे.
किल्ले सिंधुदुर्गप्रमाणे आकर्षक पद्धतीने राजकोट किल्ल्यावर तटबंदी उभारली असून शिवपुतळा बसविण्यात आलेला आहे. आता तटबंदीच्या आतील भागातील सुशोभिकरणाचे काम करण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत संपूर्ण काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. ४ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर २ रोजी संपूर्ण परिसर केंद्रीय सुरक्षा यंत्रणेच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे समजते.