Sindhudurg: वागदेतील आर्यादुर्गा मंदिरात चोरी, दानपेटी फोडली; चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
By सुधीर राणे | Published: July 25, 2023 12:40 PM2023-07-25T12:40:43+5:302023-07-25T12:41:54+5:30
पोलिस पथकासह श्वान पथक घटनास्थळी दाखल
कणकवली : कणकवली शहरालगत असलेल्या वागदे आर्यादुर्गा मंदिरात काल, सोमवारी रात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली. चोरट्याने मंदिरातील दानपेटी फोडून २५ ते ३० हजार रुपये लंपास केले. दरम्यान, चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या घटनेत आणखी काही साहित्य चोरीस गेले आहे का? याचा तपास सुरू असून कणकवली पोलिस पथकासह श्वान पथक मंदिरात दाखल झाले आहे. तसेच श्वान पथकाच्या माध्यमातून पुढील तपास सुरू आहे.
घटनास्थळी कणकवली पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव, हवालदार मनोज गुरव, उपनिरीक्षक शरद देठे, वागदे पोलिस पाटील सुनील कदम,सरपंच संदीप सावंत व अन्य नागरिक घटनास्थळी दाखल झाले होते. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून तो मंदिरात प्रवेश करतेवेळी त्याच्या हातात काही नव्हते. मात्र, तो मंदिरातून बाहेर जातेवेळी त्याच्या हातात निळ्या रंगाची पिशवी दिसून आली. कणकवली पोलिस तसेच श्वान पथक तपास करीत आहेत. लवकरच चोरट्याला ताब्यात घेण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.