फोंडाघाट खैराटवाडी येथे चोरी, मुलानेच घरात चोरी केल्याचा वडिलांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:05 PM2019-07-20T12:05:09+5:302019-07-20T12:08:08+5:30
फोंडाघाट खैराटवाडी येथील पांडुरंग भागोजी खरात यांच्या घरातील कपाट तसेच पत्र्याच्या पेटीतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा २ लाख ४० हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. ही चोरी त्यांचा मुलगा लक्ष्मण खरात याने डुप्लिकेट चावीने घराच्या दरवाजाचे कुलूप उघडून केली असल्याचा संशय पांडुरंग खरात यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे.
कणकवली : फोंडाघाट खैराटवाडी येथील पांडुरंग भागोजी खरात यांच्या घरातील कपाट तसेच पत्र्याच्या पेटीतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा २ लाख ४० हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. दरम्यान, ही चोरी त्यांचा मुलगा लक्ष्मण खरात याने डुप्लिकेट चावीने घराच्या दरवाजाचे कुलूप उघडून केली असल्याचा संशय पांडुरंग खरात यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे.
पांडुरंग खरात पत्नी सुनिता हिच्या समवेत बुधवारी सकाळी शेतावर गेले होते. तेथून ते गोठ्यातील जनावरे सोडण्यासाठी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घरी आले. त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. ते घरात गेले असता त्यांना गोदरेजचे कपाट उघडे दिसले. तसेच त्यातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. या कपाटात सोन्याचे दागिने व १० हजार रूपयांची रोख रक्कम होती.
त्याच खोलीत पत्र्याच्या पेटीत ६ हजार रुपये व विविध बँकांची पासबुक व कागदपत्रे होती. या सर्व मुद्देमालाची चोरी झाली आहे. ही चोरी त्यांचा मुलगा लक्ष्मण याने केली आहे, असे पांडुरंग खरात यांचे म्हणणे आहे. कारण यापूर्वी देखील त्याने घरात चोरी केली होती. बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण खैराटवाडी येथील साकवाजवळ काही नागरीकांना दिसला होता. तो दिवा गाडीने मुंबईला जाणार असे सांगून घाई गडबडीने तेथून निघाला होता. त्यामुळे त्याच्या विरूध्द संशय बळावला आहे.
सोन्याचे दोन डवल्या असलेले अर्ध्या तोळ्याचे मंगळसुत्र - किंमत १६ हजार रुपये, सुनिता खरात हिचे १ डवली असलेले अडीच ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र - ८ हजार रुपये , पावणेतीन तोळ्याचे ७५ हजार रुपये किमतीचे दुसरे मंगळसुत्र, दोन डवल्या असलेले सोन्याच्या पट्टीत बनविलेले ३ तोळ्याचे मंगळसुत्र सुमारे १ लाख ५ हजार रुपये, अडीच ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या - १५ हजार रुपये, जुने चांदीचे कडे - पाच हजार रुपये, कपाटात ठेवलेली १० हजार रूपयांची चिल्लर, पत्र्याच्या पेटीतील रोख सहा हजार रुपये व तीन पास बुके तसेच जमिनीची कागदपत्रे मिळून २ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल १७ जुलै रोजी सकाळी ७ ते दुपारी १२ वाजण्याच्या मुदतीत कोणीतरी चोरून नेल्याची तक्रार पांडुरंग खरात यांनी पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.
कणकवली पोलिसांनी संशयित आरोपी लक्ष्मण खरात याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देत झालेल्या चोरीचा पंचनामा केला. या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहे.
मुलाकडून पुन्हा चोरी
लक्ष्मण याने पांडुरंग खरात यांनी घरात साठवलेल्या ८० हजार रुपयांची नोव्हेंबरमध्ये तर त्यांनी मुलीच्या लग्नासाठी साठविलेले ९० हजार रुपये मे २०१९ मध्ये चोरून नेले होते. तो आपला मुलगा असल्याने समाजात बदनामी होईल. या भीतीने त्यांनी त्यावेळी पोलिसांत तक्रार दिली नव्हती. त्या दिवसापासून तो पसार झाला होता. शेवटी डुप्लिकेट चावी आणून १७ जुलै रोजी पुन्हा घरातील आजी, आई, वडीलांचे सोन्याचे दागिणे व रोख १६ हजार असा मिळून २ लाख ४० हजार रूपयांचा ऐवज लक्ष्मण याने लंपास केला आहे. काही कालावधी पूर्वी केलेली चोरी घराबाहेरील कोणाला समजली नसल्याने त्याचा धीर चेपला व त्याने पुन्हा घरातच चोरी केली आहे.