सावंतवाडीत आढळल्या चोरीच्या घंटा
By admin | Published: April 9, 2015 10:45 PM2015-04-09T22:45:07+5:302015-04-10T00:25:06+5:30
खड्ड्यातून पोलिसांनी काढल्या दोनशे घंटा
सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील महादेव भाटले भागात एका खड्ड्यात तब्बल दोनशे घंटा आढळून आल्या. या घंटा एका पोत्यात भरून टाकण्यात आल्या होत्या. मात्र, त्या खड्ड्याला आग लागल्याने ते पोते जळून गेले. या घंटांवर सावंतवाडी परिसरातील अनेक देवळाची तसेच घंटा अर्पण केलेल्या भक्ताची नावे स्पष्टपणे दिसत आहेत.
शहरातील महादेव भाटले भागात छोटे तलाव असून राजा महाराजा या ठिकाणी स्रान करण्यासाठी जात असत. त्यांच्याजवळच एक भला मोठा खड्डा आहे. या खड्ड्यात गुरूवारी सायंकाळी सुमारे १९५ घंटा आढळून आल्या आहेत. या घंटा पोत्यात भरून टाकण्यात आल्या होत्या. मात्र परिसराला लागलेल्या आगीत ज्या पोत्यात घंटा होत्या ते पोते जळून खाक झाल्याने त्या सर्व घंटा आगीत होरपळल्या होत्या. त्या घंटा गुरुवारी नागरिकांना दिसल्या. त्यांनी तातडीने यांची कल्पना पोलिसांना दिली.
पोलीस उपनिरीक्षक दिलीप वेडे, कॉन्स्टेबल संजय हुबे, अमोल सरगळे आदिंनी खड्ड्यात शोध मोहीम राबवली त्यावेळी तब्बल १९५ च्या आसपास घंटा आढळल्या. पोलिसांनी या घंटा ताब्यात घेतल्या असून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. यातील बहुतांशी घंटांवर अनेक भक्त मंडळीची नावे आढळून आली. त्यांनी या घंटा काही मंदिरात दिलेल्या होत्या. त्या घंटा चोरट्याने चोरल्या असाव्यात आणि पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी या अनोळखी ठिकाणी टाकल्या असाव्यात, असा संशय व्यक्त होत आहे. महादेव भाटले परिसरातील या जागेत सहसा कोण जात नसून अनेकवेळा या ठिकाणी पार्ट्या झोडल्या जातात. घंटा मिळालेल्या ठिकाणी दारूच्या बाटल्याही आढळून आल्या असून जेवण करण्यासाठी चुलीही मांडण्यात आल्या होत्या. या घंटाचा तपास सावंतवाडी पोलीस करीत असून उशिरापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला
नव्हता. (प्रतिनिधी)