कोलगाव येथे गोडावूनमध्ये अज्ञातांकडून चोरी
By admin | Published: June 5, 2014 12:32 AM2014-06-05T00:32:21+5:302014-06-05T00:33:59+5:30
पोलिसांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
सावंतवाडी : कोलगाव येथील प्रसाद पावसकर यांच्या सिगारेट गोडावूनवर मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी दरोडा घालत २० लाख २१ हजार १५६ रुपयांचे सिगारेटचे ३७ बॉक्स लंपास केले. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिनाभर चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरीचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. सावंतवाडी- कोलगाव तिठ्यानजीक प्रसाद पावसकर यांच्या भाड्याच्या गोडावूनमध्ये काही अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री दरोडा घातला. गोडावूनच्या समोरील दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी प्रत्येकी सुमारे ६० हजार रुपये किमतीचे ३७ बॉक्स लांबविल्याचे प्रसाद पावसकर यांनी सांगितले. प्रसाद पावसकर हे आयटीसी कंपनीचे सुपर स्टॉकिस्ट असल्याने जिल्ह्यातील सर्व ग्राहकांना मालाची डिलिव्हरी करतात. १५ वर्षांपूर्वी कोलगाव येथील गजानन नाईक यांचे गोडावून पावसकर यांनी भाडेकरारावर घेतले होते. त्यातच त्यांचे सिगारेट, सनफिस्ट बिस्कीट, अगरबत्ती असा अन्य मालांचा साठाही कोलगाव येथील गोडावनूमध्ये ठेवला जातो. बुधवारी सकाळी गजानन नाईक हे गोडावूनजवळ झाडलोट करण्यासाठी आले असता त्यांना दरवाजाचे कुलूप खाली पडलेले दिसले. नाईक यांनी तत्काळ पावसकर यांना याबाबत माहिती दिली. पावसकर यांनी तातडीने गोडावून गाठून पाहणी केली असता आतील सिगारेटचा सर्व माल लंपास झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. सावंतवाडी पोलीस निरीक्षक रणजीत देसाई यांनी घटनास्थळी दाखल होत चौकशी सुरू केली. जिल्हा गुन्हा अन्वेषण विभागाचे सुधाकर यादव यांनी सहकार्यांसह घटनास्थळी पावसकर यांच्या सर्व कामगारांचे आणि महिनाभरापूर्वी काम सोडून गेलेल्या कामगारांचे फोन कॉल्स आणि पत्ते घेऊन चौकशीस सुरुवात केली. ठसे तज्ज्ञांनी कुलूप आणि अस्ताव्यस्त पडलेल्या मालावरील ठसे घेतले.तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद वारंग करीत आहेत. (वार्ताहर)