जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरूच
By admin | Published: December 20, 2014 11:25 PM2014-12-20T23:25:40+5:302014-12-20T23:25:40+5:30
चोराना पकडण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरुच असून घरफोडी, शाळा, दुकाने, बंगले इतकेच नाही तर आता देवळातील फंडपेटी चोरीचे प्रकारही सुरु झाले आहेत. कसाल बाजारपेठ येथील गजबजलेल्या ठिकाणी शुक्रवारी रात्री सिद्धीविनायक मंदिरामधील फंडपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली व त्यातील रक्कम चोरून नेली. त्यामुळे चोरांच्या टोळ्यांना पकडण्यासाठी ओरोस पोलिसांसमोर मोठे आव्हान पुन्हा उभे ठाकले आहे.
कसाल बाजारपेठ येथे गजबजलेल्या ठिकाणी सिद्धीविनायक मंदिर आहे. त्यामुळे कसालच्या परिसरात रात्री १० ते ११ वाजेपर्यंत गाड्यांची वर्दळ असते. ओरोसच्या परिसरात गेल्या चार महिन्यांमध्ये चोरीचे प्रमाण वाढले असून आता चोरटे देवळातील फंडपेटी चोरी करू लागले आहेत.
काही ठिकाणी पोलिसांना चोर पकडण्यात यश आले आहे. काही ठिकाणी चोर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळत आहेत. कसालच्या बाजारपेठेतील सिद्धीविनायक मंदिर गजबजलेल्या परिसरात असून आजूबाजूला घरे आहेत. चोरट्यांनी रात्रीच्यावेळी चोरी केल्याचे निष्पन्न होत आहे. देवळाच्या आजूबाजूला ग्रीलचे आवरण आहे. दरम्यान श्वानपथकाला पाचारण केले होते.
सिंधुदुर्ग अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी दोनच दिवसांपूर्वी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले की आपण ज्या परिसरात रहात आहोत तेथे येणाऱ्या भाडेकरूंची माहिती घरमालकांनी आपल्या माहितीसाठी ठेवावी. त्यामध्ये नाव, गाव, फोटो, फोन नंबर, मूळ गाव आदी येणाऱ्या भाडेकरूची पूर्ण माहिती घरमालकाला असणे महत्वाचे आहे.
दरम्यान, सिंंधुदुर्ग जिल्ह्यात घरफोडी, चोरीचे प्रकार जास्त प्रमाणात वाढले आहेत. सिंधुदुर्गनगरी परिसरात गुन्ह्यांचे प्रकार वाढले असून ओरोस पोलीस स्टेशनच्या पोलिसांची यामध्ये उदासिनता दिसत आहे. पोलीस कर्मचारी रात्रीची गस्त घालण्यात रस्त्यावर ट्रक, टेंपो, मोटारसायकल अडविण्यात मग्न असतात. मात्र, असे असले तरी ठिकठिकाणी चोरीच सत्र सुरूच
आहे. (वार्ताहर)