तिलारी कालव्यातील पाण्याची होतेय चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 03:06 PM2020-05-14T15:06:12+5:302020-05-14T15:08:06+5:30
तिलारी कालव्यातून विलवडेमार्गे ओटवणेपर्यंत येणाऱ्या पाण्याची अज्ञातांकडून चोरी होत आहे. त्यामुळे कालवा होऊनही ओटवणे गाव तहानलेलेच आहे. हा प्रकार येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उघड केला.
सावंतवाडी : तिलारी कालव्यातून विलवडेमार्गे ओटवणेपर्यंत येणाऱ्या पाण्याची अज्ञातांकडून चोरी होत आहे. त्यामुळे कालवा होऊनही ओटवणे गाव तहानलेलेच आहे. हा प्रकार येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उघड केला.
ही चोरी तत्काळ रोखण्यात यावी. तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान, येत्या दोन दिवसांत ही समस्या दूर केली जाईल, असे आश्वासन तिलारीचे अधिकारी संतोष निपाणीकर यांनी दिले.
यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, संतोष भैरवरकर, विठ्ठल गावडे आदी उपस्थित होते. याबाबत सुभेदार व भैरवकर यांनी निपाणीकर यांच्याशी चर्चा करून याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, तिलारी धरणाचे पाणी ओटवणेपर्यंत येण्यासाठी कालवा काढण्यात आलेला आहे.
परंतु त्या ठिकाणी पाणी येण्यासाठी २२ मार्चला पाणी सोडण्यात आले. परंतु अद्यापपर्यंत हे पाणी ओटवणेपर्यंत पोहोचलेलेच नाही. त्यामुळे ओटवणे गावात कालवा असूनही परिसरात पाणीटंचाई आहे.
प्रश्न तत्काळ सोडवू
गावातील लोकांना टँकर बोेलविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नेमका प्रकार काय हे पाहण्याचा प्रयत्न केला असता विलवडे परिसरातील काही लोक व्हॉल्व सोडून तसेच थेट नदीच्या पात्रात पंप टाकून पाणी चोरी करीत असल्याचे दिसून आले आहे.
याबाबत अनेकवेळा अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही कोणीच दखल घेतलेली नाही. त्यामुळे आपण प्रसंगी आंदोलन करू, असा इशारा यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान, आपण तुमच्या मागणीची तत्काळ दखल घेऊ तसेच येत्या दोन दिवसांत हा प्रश्न सोडविला जाईल, असे सांगितले.