...तर सी-वर्ल्ड प्रकल्प अन्यत्र

By admin | Published: May 20, 2016 10:42 PM2016-05-20T22:42:40+5:302016-05-20T22:45:24+5:30

प्रमोद जठार : सिंधुदुर्गातील पयार्यी जागांचा विचार होणार

... then the C-World project elsewhere | ...तर सी-वर्ल्ड प्रकल्प अन्यत्र

...तर सी-वर्ल्ड प्रकल्प अन्यत्र

Next

मालवण : मालवण तालुक्यातील वायंगणी-तोंडवळी येथील प्रस्तावित जागतिक दर्जाच्या सी-वर्ल्डबाबत स्थानिक आजही अनुकूल नाहीत. आंतराष्ट्रीय दर्जाच्या असलेल्या प्रकल्पाला स्थानिक भूमिपुत्र विरोध करत असल्यामुळे सी-वर्ल्ड अन्यत्र साकारण्याबाबत चाचपणी सुरु केली आहे. पर्यटन क्रांतीत सी-वर्ल्ड हा ‘मैलाचा दगड’ ठरणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातच किमान ३०० ते ४०० एकर जागा उपलब्ध झाल्यास त्याठिकाणी सी-वर्ल्ड साकारला जाईल, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली.
मालवण येथे शासकीय विश्रामगृह येथे आयोजित भाजपा तालुका कार्यकारिणीच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, मच्छिमार सेल जिल्हाध्यक्ष रविकिरण तोरसकर, विलास हडकर, भाऊ सामंत, आप्पा लुडबे, गणेश कुशे, पंकज पेडणेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जठार म्हणाले, सी-वर्ल्ड प्रकल्प सिंधुदुर्गातच होणार आहे. मात्र त्यासाठी वायंगणी तोंडवळी ग्रामस्थांचा विरोध असेल तर तो अन्यत्र हलविला जाईल. मालवणातील पर्यायी जागांचा तसेच सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील प्रकल्पास अनुकूल अशा जागेचा विचार करून त्याठिकाणी भूमिपुत्रांना सोबत घेवूनच सी-वर्ल्ड केला जाईल. विरोधक आपल्यावर पोपटपंची करत असल्याचे आरोप करतात हे त्यांचे काम आहे. मात्र मी केवळ पोपटपंची न करता विकासकामे करून दाखवतो, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपला विकास करण्यात रस आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्याप्रमाणे ग्रामीण भागात भाजपाच्या माध्यमातून विकास साधायचा आहे, असेही जठार म्हणाले.
इच्छुक उमेदवारांसाठी खुले आवाहन
मालवण पालिका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी ज्या इच्छुकांना भाजपकडून निवडणूक लढवायची आहे. त्यांनी थेट जिल्हाध्यक्ष या नात्याने आपल्याशी संपर्क साधावा. प्रामाणिक तसेच जनसंपर्क असलेल्या इच्छुकांना निश्चितच उमेदवारी दिली जाईल. सत्तेच्या माध्यमातून पालिका क्षेत्र व गावाचा विकास करताना या उमेदवारांना बळ दिले जाईल, असेही जठार यांनी सांगितले. त्यामुळे इच्छुकांनी संपर्क साण्याचे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)

शतप्रतिशत भाजपा हेच धोरण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी काळात नगरपंचायत, नगरपालिका तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत युतीबाबत निर्णय घेतलेला नाही. निवडणुका डोळ्यासमोरून ठेवून निवडणूकपूर्व तयारी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
आम्ही केवळ पक्षवाढीच्या धोरणाचा विचार करता ध्येयधोरणे राबवणार आहोत. त्यामुळे याचा परिणाम निवडणूक निकालावर काय होतो, विरोधी पक्षांना कसा फायदा होतो याचा विचार न करता केवळ ‘शतप्रतिशत भाजपा’हेच धोरण अवलंबले जाणार आहे, असेही जठार यांनी सांगितले.

Web Title: ... then the C-World project elsewhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.