...तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
By admin | Published: December 11, 2014 11:10 PM2014-12-11T23:10:12+5:302014-12-11T23:43:20+5:30
रणजीत देसाई यांचे आदेश : जिल्हा परिषद कृषी समिती सभा
सिंधुदुर्गनगरी : वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे विद्युत तारा तुटून मनुष्य तसेच जनावरे दगावण्याच्या घटना घडतात, अनेक ठिकाणी बागायती जळून खाक होतात. याला केवळ आणि केवळ वीजवितरण कंपनी जबाबदार आहे. तरी यापुढे मनुष्यहानी झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असा महत्त्वपूर्ण ठराव गुरूवारच्या कृषी समिती सभेत घेण्यात आला.
जिल्हा परिषद कृषी समितीची सभा जिल्हा परिषद उपाध्यक्ष सभापती रणजीत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी येथील बॅ. नाथ पै सभागृहात झाली. यावेळी सदस्या रेश्मा जोशी, सोनाली घाडीगावकर, प्रमोद सावंत, जिल्हा कृषी अधिकारी एस. एन. म्हेत्रे, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
सावंतवाडी तालुक्यात विजेच्या तारा अंगावर पडून दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाला होता. याला सर्वस्वी वीज वितरण कंपनी जबाबदार आहे, असा आरोप करीत वीज वितरण कंपनीकडून अनेक ठिकाणी विद्युतवाहिन्यांना गार्ड बसविण्यात आलेले नाहीत. वीज वितरण कंपनीच्या बेपर्वाईमुळे विजेच्या तारा तुटून जीवितहानी झाल्याच्या, जनावरे दगावल्याच्या तसेच मोठमोठ्या बागायती जळून खाक झाल्याच्या घटना वारंवार घडत असतात. असे सावंतवाडी पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत यांनी सभागृहात सांगितले. तर यापुढे अशाप्रकारे मनुष्यहानी झाल्यास संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली. वीज वितरण कंपनीकडून जीर्ण झालेले खांब, विद्युतवाहिन्या वेळीच बदलणे आवश्यक आहे. मात्र, दखल न घेतल्याने वारंवार अपघात घडतात. तरी अशावेळी वीज वितरण कंपनीला जबाबदार धरून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असा ठराव आजच्या कृषी समिती सभेत घेण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला चालू वर्षी १५०० बायोगॅस बांधण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ५६९ बायोगॅस बांधून पूर्ण झाले आहेत. तर बायोगॅस प्रकल्पाची १५ वर्षापर्यंत आयुष्यमर्यादा निश्चित करण्यात आली असल्याची माहिती सभेत देण्यात आली. तर ज्या बायोगॅसला पंधरा वर्षे पूर्ण होऊन जीर्ण झाले आहेत. अशा लाभार्थीला पुन्हा बायोगॅससाठी प्रस्ताव करता येणार असल्याची माहिती सभेत देण्यात आली. उन्हाळी हंगामासाठी कृषी विभागामार्फत ५० टक्के अनुदानावर भाजीपाला बियाणे किट पुरविण्यात येत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी बसविण्यात आलेल्या हवामान मोजणी यंत्रावर झाडीझुडपे वाढलेली आहेत. ती तत्काळ तोडण्यात यावी. तसेच विमा कंपनीचे जनसंपर्क कार्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्हावे त्यासाठी प्रस्ताव करा, अशी सूचना सभेत घेण्यात
आली. (प्रतिनिधी)