...तर पालकमंत्री, आमदारांनी आमने-सामने यावे
By admin | Published: September 28, 2016 11:31 PM2016-09-28T23:31:39+5:302016-09-28T23:59:42+5:30
काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे आव्हान : खरे ठेकेदार शिवसेनेचेच असल्याचा पलटवार
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाचा खरा ठेकेदार हा शिवसेनेचे रत्नागिरीतील आमदार उदय सामंत यांचा भाऊ आहे. जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची कामे आमदार वैभव नाईक यांच्या भावाने केली आहेत. हे सत्य जनतेला माहिती आहे. याउलट महामार्गावरील खड्डे नारायण राणेंनी स्वखचार्तून बुजविले असतानाही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी टीका केली आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. पण, या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी शासनाने दिलेला २ कोटीचा निधी गेला कुठे? असा प्रश्न उपस्थित करतानाच हिंमत असेल तर पालकमंत्री तसेच शिवसेना आमदारांनी या निधीच्या तसेच विकासाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी आमने-सामने यावे असे आव्हान कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, शहराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिले.
येथील काँग्रेस संपर्क कार्यालय बुधवारी संयुक्तरित्या आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंगळवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले. यावेळी पंचायत समिती उपसभापती महेश गुरव, जिल्हा परिषद सदस्य सुरेश ढवळ, युवक विधानसभा मतदार संघ अध्यक्ष संदीप मेस्त्री, नगरसेवक अण्णा कोदे, बंडु हर्णे , मिलिंद मेस्त्री आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
ते म्हणाले, शिवसेनेच्या बिनकामाच्या पदाधिकऱ्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणेंवर केलेल्या टीकेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणारी कंपनी ही शिवसेनेचे आमदार उदय सामंत व त्यांच्या भावाची आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने महामार्गावर पडलेले खड्डे हे शिवसेनेचेच पाप आहे. याउलट गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्याच्या नावाखाली शासनाकडून पुन्हा २ कोटी रुपयाचा निधी आला. तो निधी कुठे गेला? या ठेकेदारांनीच हा निधी खाल्ला का? असा प्रश्न ही यावेळी उपस्थित करण्यात आला.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करत जनतेच्या सोयीसाठी खड्डे बुजविले आहेत. त्यांची प्रशंसा करण्याचे सोडून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. हे बालिशपणाचे लक्षण आहे. मुळात २ वर्षात सत्ता आल्यानंतर शिवसेनेने काय केले? याचे उत्तर आधी द्यावे. असे संदेश सावंत म्हणाले.
शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचे भाऊ सतीश नाईक हे कनेडी-नाटळ, कसाल-मालवण आदी रस्ते व कुडाळ तालुक्यातील सगळ्याच विकास कामांचे ठेके कोल्हापूर येथील कंपनीच्या नावाखाली घेऊन स्वत:च काम करीत आहेत. त्याचबरोबर भास्कर राणे देखील अनेक कामे करीत आहेत. या ठेकेदारांमागे शिवसेनाच आहे. कणकवली शहरातील अनेक बांधकामे नाईक कुटुंबियांनीच केली आहेत.
या बांधकामांजवळील अनेक विहिरींचे पाणी दूषित झालेले आहे. त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राणेंवर टीका करण्यापेक्षा पहिल्यांदा या ठेकेदारांवर कारवाई कण्याची हिंमत दाखवावी. पालकमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे कृती करावी. त्यासाठी कॉँग्रेस त्यांच्या सोबत असेल. असे समीर नलावडे यांनी यावेळी सांगितले.
निकृष्ट कामांच्या तक्रारी करुन गेली २ वर्षे शिवसेना तालुकाप्रमुख आणि त्यांचे पदाधिकारी सेटलमेंट करत आहेत. तालुकाप्रमुखांची देखील कसवण भागात ठेकेदारी सुरु आहे. त्यामुुळे या चिल्लर कंपनीने आम्हाला सल्ले देऊ नयेत. सत्तेतील भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार देखील पालकमंत्री अकार्यक्षम असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे मोदी लाटेत निवडून आलेल्या नेत्यांबरोबर राहून कॉँग्रेसला कोणीही विनाकारण डिवचू नये. असा इशारा तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांनी यावेळी दिला
आहे. (प्रतिनिधी)
जनतेकडून कामाची पोचपावती !
महामार्गावर अपघातांना आमंत्रण देणारे खड्डे काँग्रेसच्या माध्यमातून श्रमदानाने बुजविण्यात आले आहेत. त्याबद्दल अधिकारी तसेच जनतेकडून चांगले काम केलात. अशी प्रतिक्रिया आमच्याकडे व्यक्त केली जात आहे. त्यांची ही प्रतिक्रियाच आमच्या कामाची पोचपावती आहे. हे शिवसेनावाल्यांनी लक्षात घ्यावे.असे सुरेश सावंत यावेळी म्हणाले.