...तर नगरसेवकपदाचा राजीनामा द्या

By admin | Published: October 11, 2015 08:51 PM2015-10-11T20:51:00+5:302015-10-12T00:56:58+5:30

मतदारांकडून निषेध : प्रभागात आयोजित बैठकीत व्यक्त केल्या भावना

... then quit the municipal council | ...तर नगरसेवकपदाचा राजीनामा द्या

...तर नगरसेवकपदाचा राजीनामा द्या

Next

कणकवली : काँग्रेस नेते नारायण राणे यांनी कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधून दिलेल्या चार उमेदवारांना तेथील मतदारांनी भरघोस मतांनी निवडून दिले होते. मात्र, या मतदारांच्या भावनांचा विचार न करता ८ आॅक्टोबरला झालेल्या नगराध्यक्षा निवडीत अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांनी गद्दारी करीत आपल्याच प्रभागातील नगरसेविकेच्या विरोधात मतदान केले. हा आमचा अपमान असून याचा आम्ही निषेध करीत आहोत. त्या स्वाभिमानी असतील तर त्यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा; अन्यथा आम्हाला वेगळे प्रयत्न करावे लागतील. तसेच संदेश पारकर जी निशाणी देतील, त्याच्यावर पुन: निवडून येऊन दाखवावे, अशा संतप्त भावना व्यक्त करणारा ठराव प्रभाग १ मधील मतदारांनी रविवारी झालेल्या बैठकीत केल्याची माहिती नगरसेवक किशोर राणे यांनी दिली.कणकवली नगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घडामोडींचे पडसाद अजूनही कणकवली शहरात उमटत आहेत. रविवारी येथील मातोश्री मंगल कार्यालयात अ‍ॅड. प्रज्ञा खोत नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या प्रभाग क्रमांक १ मधील मतदारांनी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी अनेक मतदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच काही ठरावही घेण्यात आले. यावेळी नगरसेवक किशोर राणे, गौतम खुडकर, नगरसेविका सुविधा साटम, विठ्ठल देसाई, संदीप राणे, अजय गांगण, भूपेश राणे, शांताराम राणे, मनोहर राणे, खेमाजी राणे, सोनू देसाई, विजय पवार, सोनू कामतेकर, जावेद शेख, संदीप घाडी, नितीन मेस्त्री, बाबूराव कांबळी, महेंद्र जाधव, चारुदत्त साटम, राजन परब यांच्यासह सुमारे शंभर मतदार उपस्थित होते.
या बैठकीनंतर नगरसेवक किशोर राणे यांनी बैठकीत चर्चा झालेल्या मुद्यांबाबत तसेच घेतलेल्या ठरावांबाबत पत्रकारांना माहिती
दिली.
ते म्हणाले, कणकवली ग्रामपंचायत असताना सरपंच म्हणून पुतळोजी राणे यांना संधी मिळाली होती. सन २0१0 मध्ये मला उपनगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली होती, तर त्यानंतर नगराध्यक्ष म्हणून अ‍ॅड. खोत यांना संधी देण्यात आली होती. मात्र, या बाबींचा खोत यांना विसर पडला आहे. ग्रामीण भागाला पुन्हा प्रतिनिधित्व देण्यासाठी नारायण राणे यांनी सुविधा साटम यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली होती.
परंतु, खोत यांनी त्यांच्याविरोधी मतदान केले. नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ चारही उमेदवारांनी एकत्रितपणे फोडून विकासाचे वचन मतदारांना देवासमोर दिले होते. त्यातीलच एका नगरसेविकेने सहकाऱ्यांबरोबरच मतदारांशी गद्दारी केली आहे.
नगराध्यक्ष निवडणुकीत संदेश पारकर यांनी पडद्यामागून कूटनीतीचा अवलंब केला. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदार यानंतर कधीही त्यांना साथ देणार नाहीत. तसेच आपला अपमान सहन करणार नाहीत, अशा भावना अनेक मतदारांनी व्यक्त केल्या असल्याचे राणे यांनी सांगितले. (वार्ताहर)


आपल्या प्रभागातील मतदारांना विश्वासात घेऊन त्यांनी हा निर्णय घ्यायला हवा होता; पण तसे झाले नाही. त्यांच्या हट्टी स्वभावामुळे शहरातील लोकांना सध्या खड्ड्यांतून प्रवास करावा लागतो आहे.
ज्या कार्र्यकर्त्यांनी निवडणुकीत त्यांचा प्रचार केला होता, त्यांनाही त्या ओळखत नाहीत. किरकोळ कामांसाठी अनेकवेळा नगरपंचायत कार्यालयात त्यांना फेऱ्या माराव्या लागत आहेत. हे योग्य नव्हे. इतर तीन नगरसेवकांनी आपली जनसेवा सुरु ठेवली आहे.
मात्र, निवडून आल्यानंतर तीन ते चारच वेळा खोत यांनी प्रभागाला भेट दिली असेल. त्यामुळे त्यांना येथील समस्या कशा समजणार ? असाही प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.

Web Title: ... then quit the municipal council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.