..तर संबंधितांवर कारवाई करणार
By admin | Published: June 7, 2016 11:55 PM2016-06-07T23:55:19+5:302016-06-08T00:10:43+5:30
शेखर सिंह : जिल्हा परिषद स्थायी समिती सभा
सिंधुदुर्गनगरी : सिंधुुदुर्गातील रस्त्यांचा दर्जा दरवर्षी खालावत जात असल्याने रस्ते खराब होत आहेत. पावसात तर रस्त्यांचे डांबर जावून त्याचे डबके तयार होत आहे. संबंधित ठेकेदाराने निविदा प्रक्रियानुसार डांबर, खडी, रवाळी यांचे योग्य प्रमाण नसल्याने रस्त्याची क्वॉलिटी टिकत नसल्याचा आरोप सदस्य सतीश सावंत यांनी करत निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कोणती कारवाई करणार असा सवाल उपस्थित केला. निकृष्ट व नादुरुस्त रस्त्यांची शासनाच्या क्वॉलिटी कंट्रोलमार्फत तपासणी करण्यात येणार असून त्यात दोष आढळला तर संबंधित शाखा अभियंता व उपअभियंता यांच्यावर कारवाई होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद स्थायी समितीची मासिक सभा जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, विषय समिती सभापती दिलीप रावराणे, आत्माराम पालेकर, रत्नप्रभा वळंजू, अंकुश जाधव, समिती सदस्य सतीश सावंत, मधुसूदन बांदिवडेकर, रणजित देसाई, प्रमोद कामत, रेवती राणे, वंदना किनळेकर, श्रावणी नाईक, समिती सचिव तसेच पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल बागल, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
सिंधुदुर्गातील १७ प्राथमिक व ८ उच्च प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीच्या बांधकामासाठी शासनाकडून ५१ लाख ६२ हजार रुपये प्राप्त झाले असल्याची माहिती सर्व शिक्षा अभियानाच्या समन्वयक स्मिता नलावडे यांनी दिली. या शाळांची प्राधान्याने दुरुस्ती करण्यात येणार आहे.
डोहातला गाळ महामार्गासाठी वापरा
गावातील नदी व ओहोळामधील डोहात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने पाण्याचे स्त्रोत मंद झाले आहेत. पुढील वर्षी हा सर्व गाळ काढून तो महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भरावासाठी वापरावा अशी सूचना सदस्य रणजित देसाई यांनी केली. याला सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून फोंडा येथे शौचालय व गोठ्यांच्या बांधकामे करण्यात आली. मात्र २०१ शौचालय लाभार्थ्यांपैकी केवळ २५ जणांनाच लाभ देण्यात आला आहे. तर १७६ लाभार्थी वंचित राहिले आहेत. तर गोठ्यांचे लाभार्थीही अनुदानापासून वंचित आहेत. त्यांना तत्काळ अनुदान वर्ग करा अशा सूचना सदस्य मधुसूदन बांदिवडेकर यांनी केल्या. संबंधित लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्यात येईल असे कमलाकर रणदिवे व डॉ. अनिल बागल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)