देशात लोकशाहीविरोधी वातावरण वाढतंय
By admin | Published: November 18, 2016 11:53 PM2016-11-18T23:53:04+5:302016-11-18T23:53:04+5:30
दक्षिणायन संवाद यात्रा : लेखक, सामाजिक कार्यकर्त्यांच्या चर्चेतील सूर
कणकवली : देशात दिवसेंदिवस लोकशाही विरोधी वातावरण वाढत आहे. धार्मिक उन्माद चालू असून त्या विरोधात आवाज उठविण्यासाठीच दक्षिणायन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जनतेला गृहीत धरून राजकीय व्यक्ती सत्ता राबवित आहेत. तसेच सत्ताधारी धार्मिक उन्माद वाढविणाऱ्यांना प्रोत्साहन देत आहेत, असा सूर सामाजिक कार्यकर्ते, नामवंत लेखक तसेच पत्रकारांंच्या चर्चेत उमटला.
ज्येष्ठ भाषातज्ज्ञ, विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी देशातील असहिष्णू वातावरणाविरोधात ‘दक्षिणायन यात्रा’ देशात सुरू केली आहे. त्याअंतर्गत बहुभाषिक राष्ट्रीय दक्षिणायन संमेलन १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत मडगाव येथे होत आहे. यात सहभागी होणाऱ्यांची संवादयात्रा मुंबई ते गोवा अशी आयोजित करण्यात आली आहे. या संवाद यात्रेतील ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे, समीक्षक मंदार काळे, पत्रकार युवराज मोहिते, यूथ मोटीव्हेटर आशुतोष शिर्के, सामाजिक कार्यकर्ते राजन इंदुलकर आदींनी समाजयात्रेच्या निमित्ताने वागदे येथील गोपुरी आश्रमाच्या सभागृहात नागरिकांशी गुरुवारी संवाद साधला.
यावेळी युवराज मोहिते म्हणाले, देशात लोकशाही विरोधी आज जे वातावरण निर्माण झाले आहे; त्याविरुद्ध लोकांना बोलावेसे वाटत आहे. त्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. विशिष्ठ विचार लादला जाण्याच्या प्रकारातून माणसाच्या मूलभूत हक्कांवरच गदा येत आहे. अनेक निर्बंध लादले जात आहेत. विकासाचे चित्र उभे करण्यात येत असले तरी दुसऱ्या बाजूला माणसांच्या स्वातंत्र्याची मुस्कटदाबी केली जात आहे.
यावेळी मोहिते यांनी, धर्म आणि श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेचे वर्चस्व ठेऊन माणसालाच दाबले जात आहे. त्यामुळे बुवाबाजी वाढली असल्याचे मत व्यक्त केले. येथे वेगळा विचार करणाऱ्याला गुन्हेगार ठरविण्यात येत आहे. यातूनच डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली. या सगळ्यामागे राजकारण आहे. हे आता विचार करणाऱ्या वर्गाने समजून घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मंदार काळे, आशुतोष शिर्के, राजन इंदुलकर आदींनीही यावेळी विचार मांडले. यावेळी झालेल्या चर्चेत डॉ. शमिता बिरमोळे, इंद्रजीत खांबे, अर्पिता मुंबरकर, विनायक सापळे, शशिकांत कांबळी आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)