corona virus-देवगडात आंबा खरेदीसाठी ग्राहकच नाहीत, उभारलेले स्टॉल ठरताहेत शोभेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 03:50 PM2020-04-04T15:50:58+5:302020-04-04T15:55:40+5:30
देवगड तालुक्यामध्ये काही ठिकाणी आंबा स्टॉल उभारण्यात आले आहेत. मात्र, आंबा खरेदी करण्यासाठी ग्राहकच नसल्याचे हे स्टॉल शोभेचे ठरले आहेत. यामुळे देवगड तालुक्याची आर्थिक नाडी असलेल्या आंबा व मत्स्य व्यवसायाला कोरोनामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तालुक्याच्या दरडोई उत्पन्नातही यामुळे घट होणार आहे.
अयोध्याप्रसाद गावकर
देवगड : देवगड तालुक्यामध्ये काही ठिकाणी आंबा स्टॉल उभारण्यात आले आहेत. मात्र, आंबा खरेदी करण्यासाठी ग्राहकच नसल्याचे हे स्टॉल शोभेचे ठरले आहेत.यामुळे देवगड तालुक्याची आर्थिक नाडी असलेल्या आंबा व मत्स्य व्यवसायाला कोरोनामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तालुक्याच्या दरडोई उत्पन्नातही यामुळे घट होणार आहे.
सध्या देवगड तालुक्यामधील अनेक टन आंबा बागायतदारांनी काढून मार्केट सुरू नसल्यामुळे घरीच ठेवला आहे. या आंब्याला बाजारपेठा उपलब्ध नसल्यामुळे व ज्यूस, पल्पचे कारखानेदेखील बंद असल्यामुळे हा आंबा आता कुजण्याच्या प्रक्रियेत येऊन ठेपला आहे. हापूस आंब्याच्या ऐन हंगामात कोरोना विषाणूने देशात शिरकाव केल्यामुळे याचा परिणाम पूर्णत: देवगड हापूसवर झाला आहे. सहा महिने मशागत करून, येथील बागायतदारांनी लाखो रुपयांची कीटकनाशक औषधांची फवारणी करून शेतकऱ्यांनी आंबा पीक घेतले आहे.
मार्च महिन्याच्या शेवटी व एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच एकूण उत्पादनापैकी आठ ते दहा टक्के आंबा परिपक्व झाला आहे. झाडावरती आंबा पिकून पडता नये यासाठी बागायतदारांनी परिपक्व झालेल्या आंब्याची तोडणी करून तो घरामध्येच ठेवला आहे. काही तालुक्यातील व्यापाऱ्यांनी येथील स्थानिक बाजारपेठांमध्ये स्टॉल उभारून त्या ठिकाणी आंबा विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंबा खरेदीसाठी कोणीही ग्राहक नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच शासनाने राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर व अन्य महत्त्वाच्या शहरांमध्ये आंबा वाहतूक करण्यास परवाना धारकांना परवानगी दिली आहे.
हा परवाना दाखला देवगड तहसीलदार कार्यालयामधून उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन असताना आंबा खरेदी करण्यास कोणीही ग्राहक उत्सुक नसल्याचे दिसत आहे. तसेच मुंबई, पुणे यांसारख्या शहरांतील मार्केटमध्ये येथील बागायतदारांनी आंबा विक्रीसाठी पाठविला आहे. मात्र, त्या ठिकाणीदेखील खरेदी करण्यासाठी ग्राहकच नसल्याने वाशी मार्केटमध्ये हजारो पेट्या अद्याप पडून राहिल्या आहेत.
उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी अवस्था मुळातच बागायतदारांची असताना यावर्षी कोरोना विषाणूमुळे संपूर्णपणे बागायतदारांचे नुकसानच होणार असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. १५ एप्रिलनंतर देवगड तालुक्यातील हापूस आंब्याची तोडणी नियमित केली जाणार आहे. कारण या कालावधीमध्ये आंबा हा नियमित तोडण्यास परिपक्व असणार आहे. देशात १४ एप्रिलनंतर कोरोना विषाणू नियंत्रणात न आल्यास व संचारबंदी कालावधी वाढला गेला तर आंबा बागायतदार कर्जाच्या खाईतच अडकून पडणार आहेत.
कोरोना विषाणूला लगाम घालण्यासाठी केंद्रशासन व राज्य शासन वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहेत. याला जनतादेखील बऱ्याच प्रमाणात प्रतिसाद देत आहे. मात्र, बाजारपेठांमध्ये आंबा खरेदी करण्यास ग्राहक नसल्यामुळे आंबा बागायतदारांचे नुकसान होत असल्याचे सरळ सरळ दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये शासनाने आंबा ज्यूस, पल्प व वाईन बनविण्यासाठी विविध कंपन्यांना सवलती देऊन प्रोत्साहित करावे. शेतकऱ्यांचा सरसकट आंबा १०० रुपये प्रतिकिलो दराने घेण्यास सांगितले पाहिजे.
विविध कंपन्यांनीदेखील पुढे येऊन स्वत:च्या फायद्याबरोबरच शेतकऱ्यांचे हित जोपासण्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची पावले उचलली पाहिजेत. तरच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंबा बागायतदारांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
आंबा घरपोच देण्याची व्यवस्था करावी
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आॅनलाईन बुकिंगवरती आंबा घरपोच देण्याची सुविधा शासनाने निर्माण करावी, अशी मागणी आंबा बागायतदार अरविंद वाळके यांनी केली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरती आज देशासहीत जागतिक बाजारपेठाही बंद आहेत. यामुळे देवगड हापूसची परदेशवारी नाहीच तर देशात व राज्यातही आंबा विक्री करू शकत नाही. अशी गंभीर समस्या आंबा बागायतदारांपुढे निर्माण झाली आहे.
यामुळे शासनाने संचारबंदीच्या काळामध्ये मुंबई येथील वाशी मार्केटमधून व राज्याच्या अनेक मार्केटमधून आॅनलाईन आंबापेटी बुकिंग करून घरपोच सेवा दिली पाहिजे. तरच आंबा घरपोच उपलब्ध होऊन बागायतदारांचा आंबा देखील विक्री होऊ शकतो. अशी सुविधा संचारबंदीच्या काळात संचारबंदीचे उल्लंघन न करता केली पाहिजे, अशी मागणी आंबा बागायतदार अरविंद वाळके यांनी केली आहे. देवगड तालुक्यामधील अनेक टन आंबा बागायतदारांनी काढून मार्केट चालू नसल्यामुळे घरीच ठेवला आहे. या आंब्याला बाजारपेठा उपलब्ध नसल्यामुळे व ज्यूस, पल्पचे कारखानेदेखील बंद असल्यामुळे हा आंबा आता कुजण्याच्या प्रक्रियेत येऊन ठेपला आहे.