महामार्ग चौपदरीकरणांतर्गत समस्यांमध्ये होतेय वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 03:42 PM2020-07-14T15:42:18+5:302020-07-14T15:49:44+5:30
कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणांतर्गत बांधण्यात आलेले सर्व्हिस रस्ते तसेच त्यालगतच्या गटारांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची बाब ऐन पावसाळ्यात समोर आली आहे.
कणकवली : कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणांतर्गत बांधण्यात आलेले सर्व्हिस रस्ते तसेच त्यालगतच्या गटारांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची बाब ऐन पावसाळ्यात समोर आली आहे.
बॉक्सेल तसेच उड्डाणपुलाच्या कामाची स्थितीही तशीच असून ठेकेदार कंपनीकडून त्याकडे दुर्लक्षच करण्यात येत आहे. त्यामुळे समस्यांमध्ये वाढ होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर महामार्गाच्या या कामाचा निकृष्ट दर्जा विविध घटनांमुळे दिसून आला आहे. शहरातील नाल्यांची कामे व्यवस्थित करण्यात न आल्याने अलीकडेच रामेश्वर प्लाझा संकुलात पाणी साचले होते.
लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी काही समस्या निदर्शनास आणल्यावर त्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यात येत आहे. मात्र, ही मलमपट्टी कायमस्वरूपी टिकणार नसल्याने एखादी दुर्घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार राहणार? असा प्रश्न जनतेला पडला आहे.
महामार्ग चौपदरीकरणासाठी भूसंपादन करण्यात आले असून त्याची हद्द निश्चित करण्याच्या सूचनांसोबतच धोकादायक अर्धवट ठेवलेल्या इमारतीबाबत निर्णय घेण्याच्या सूचनाही जूनमध्ये झालेल्या बैठकीत प्रशासनास तसेच ठेकेदार कंपनीस पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याबाबतही अजून ठोस काही झालेले नाही.
लोकप्रतिनिधी अथवा नागरिकांकडून प्रत्येक बैठकीत अथवा पाहणी दौऱ्यात केवळ इशारे दिले जातात. मात्र, समस्या कायमस्वरूपी सुटली आहे, असे काही झालेले दिसून येत नाही. त्यामध्ये उड्डाणपुलाला जोडणाºया बॉक्सेलच्या भिंतीच्या समस्येसोबतच सर्व्हिस रस्त्यावर येणारे पाणी, परिवर्तित मार्गाच्या ठिकाणी होणारा चिखल, नाले, गटारांच्या समस्या, खड्डे बुजविणे, शहरातील ४५ मीटरची हद्द निश्चित करणे, अर्धवट व धोकादायक इमारती पाडणे आदींबाबत चर्चा झाली होती.
त्यादृष्टीने कार्यवाहीच्या सूचनाही दिल्या. मात्र, किरकोळ मलमपट्टी वगळता ठोस असे काही झाले नाही.
वाहने चालविणे कठीण : दुर्घटना घडण्याची शक्यता
शहरात जोरदार पाऊस पडल्यानंतर सर्व्हिस रस्त्यांना नाल्याचे स्वरुप प्राप्त होत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांनी त्यावरून कसे चालायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील बसस्थानकाच्यासमोर तर सर्व्हिस रस्त्यावरून वाहने चालविणेही कठीण होत आहे. तेथून जवळच असलेल्या पेट्रोल पंपासमोरही रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. परिवर्तित मार्गाच्या ठिकाणी डांबरीकरण करण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
पावसाळ्यात उद्भवणाºया संभाव्य अडचणींच्या अनुषंगाने महसूल प्रशासन व नगरपंचायतीकडूनही ठेकेदार कंपनीसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाºयांच्या बैठका घेऊन वेळोवेळी सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्यानंतर २३ जून रोजी प्रांताधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत तातडीची कामे पूर्ण करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच ठेकेदार कंपनीला दिल्या. अर्धवट स्थितीतील धोकादायक इमारतींबाबतही अजून कार्यवाही झालेली नाही.
त्यामुळे प्रशासन व ठेकेदार कंपनी मोठी दुर्घटना घडण्याची वाट ही कामे करण्यासाठी पहात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर या समस्येतून आपली कधी सुटका होणार? असा प्रश्नही नागरिकांना पडला आहे.