आंबोलीत घाटात दरडीचा भला मोठा दगड रस्त्यावर, पावसाळ्यापूर्वीच पडझडीच्या घटनेने भीती
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 6, 2024 11:52 AM2024-06-06T11:52:50+5:302024-06-06T11:54:03+5:30
आंबोली ( सिंधुदुर्ग ) : येथील घाटात धबधब्याच्या परिसरात पहाटे भला मोठा दगड रस्त्यावर कोसळून बाजूला असलेल्या संरक्षक भितीकडे ...
आंबोली (सिंधुदुर्ग ) : येथील घाटात धबधब्याच्या परिसरात पहाटे भला मोठा दगड रस्त्यावर कोसळून बाजूला असलेल्या संरक्षक भितीकडे जावून स्थिरावला आहे. ही घटना आज पहाटे पूर्वीचा वस परिसरात घडली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. याबाबतची माहिती सावंतवाडीच्या माजी नगरसेविका अफरोझ राजगुरू यांनी दिली.
दरम्यान हा प्रकार घडला तरी वाहतूक सुरळीत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याबाबतची माहिती वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली आहे, असे पोलिस हवालदार दत्ता देसाई यांनी सांगितले.
दरम्यान ऐन वर्षा पर्यटनाच्या तोंडावर हा प्रकार घडल्यामुळे त्याचा फटका आंबोली पर्यटनावर बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे गंभीर दखल घेऊन अशा प्रकारे दगड कोसळू नये यासाठी योग्य ती उपाययोजना राबवावी, अशी मागणी राजगुरू यांनी केली आहे.
आंबोली घाट दिवसेंदिवस धोकादायक होत चालला आहे. सात ते आठ वर्षापूर्वी आंबोली घाट वारंवार कोसळण्याचा प्रकार सुरू होता. त्यामुळे पर्यायी रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेली अनेक वर्षे या विषयावर चर्चा सुरू आहे. मात्र अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर पर्याय काय? हा मात्र प्रश्नचिन्ह आहे.