मी नाराज नाही, कोकणची सेवा करण्याची इच्छा - दीपक केसरकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 13:58 IST2024-12-17T13:56:56+5:302024-12-17T13:58:19+5:30
सावंतवाडी : माझ्या मंत्रिपदाच्या काळात सर्वांनाच न्याय दिला. मी केलेल्या कामाचे मला पूर्ण समाधान वाटते. मी नाराज नाही, उलट ...

मी नाराज नाही, कोकणची सेवा करण्याची इच्छा - दीपक केसरकर
सावंतवाडी : माझ्या मंत्रिपदाच्या काळात सर्वांनाच न्याय दिला. मी केलेल्या कामाचे मला पूर्ण समाधान वाटते. मी नाराज नाही, उलट सर्वानाच विश्वासात घेऊन आणखी चांगले काम करून दाखवेन, असा विश्वास माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. मला कोकणची सेवा करण्याची इच्छा असून, निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यात तशी तयारी दर्शवली होती, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळ विस्तारात केसरकर यांचे नाव नव्हते. केसरकर मुंबईहून शिर्डीला निघाले. त्यावेळी भ्रमणध्वनीवरून पत्रकारांशी संवाद साधला. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला जाण्यापूर्वी त्यांनी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले.
केसरकर म्हणाले, मी दोनवेळा मंत्री म्हणून काम केले आहे. कोकण विभाग हा दुर्लक्षित राहिला आहे. मुंबईच्या जवळचे भाग विकसित झाले. मात्र, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर याकडे अधिकच लक्ष देणे आवश्यक होते. त्यामुळे या विभागाची अधिकची सेवा घडावी, अशी साईंची इच्छा असेल म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तसा निर्णय घेतला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संघर्ष करणारे नेते आहेत. चांगल्या योजना त्यांनी राज्यात राबविल्या. बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक कसा असतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. माझ्यावर अन्य कोणती जबाबदारी दिली जाणार आहे का ? याची कल्पना नाही. आमदारांची भेट घेताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकदाच भेट झाली. त्यानंतर अद्याप भेट झालेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षणविभागात मी क्रांतीकारी निर्णय घेतले. पुढील मंत्र्यांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. मराठी भाषा विभागातही उल्लेखनीय कार्य केले. मी केलेल्या कामाचे समाधान आहे. साईबाबा जे घडवतात ते चांगल्यासाठीच घडवतात. उद्या नागपूरला जाणार असून नवनिर्वाचित मंत्र्यांचे अभिनंदन केल्याचे त्यांनी सांगितले. तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगले यश महायुतीला मिळू दे, असे साकड साईचरणी घातले असल्याचे त्यांनी सांगितले.
कोकणची सेवा करणार
जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. भविष्यात सर्वांगीण विकास झाल्यावर ते आणखीन वाढेल व पहिल्या क्रमांकावर येऊ शकेल. साईबाबांची तशी इच्छा असेल अन् ते माझ्या हातून घडेल. मंत्री असताना महाराष्ट्राची सेवा केली आता कोकण विभागाची सेवा करणार आहे, असे केसरकर यांनी सांगितले.