सिंधुदुर्गवासियांना दिलासा!, ओसरगाव टोलनाक्यावर टोल वसुली नाहीच, अद्याप संभ्रमच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 01:42 PM2022-12-02T13:42:56+5:302022-12-02T13:43:25+5:30
टोलवसुली करण्याकरिता ठेकेदार कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. मात्र, टोल वसुलीच झाली नाही.
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव टोलनाक्यावर टोलवसुली करण्याकरिता ठेकेदार कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. त्यामध्ये १ डिसेंबर २०२२ पासून टोल वसुली होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, संबधित ठेकेदार कंपनीकडून गुरुवारी ओसरगाव येथे टोल वसुलीच झाली नाही. त्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
राजकीय पक्षांकडून सिंधुदुर्गातील वाहनांना टोल माफ करावा,अशी मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर टोल वसुली कधी होणार? याबाबत वाहन चालकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विकास कामे होण्याकरिता टोल द्यावा लागणार असल्याची भूमिका अलीकडेच मांडली होती. तर त्याला मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विरोध केला आहे. टोलवसुलीचे कंत्राट मिळालेल्या गणेश गढीया कन्स्ट्रक्शन कंपनीने क्षेत्रीय कार्यालयाकडे अनामत रक्कम भरल्यानंतर या कंपनीला रितसर कार्यारंभ आदेश देत टोल वसुलीची जाहीर नोटीस प्रसिद्धी केली आहे. या टोलवसुलीचे दर कुठल्या वाहनांना किती असणार आहेत? याबाबत जनतेला माहिती होण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाकडून नोटीस प्रसिध्द करण्यात आली आहे.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
जिल्हयातील राजकीय पक्षांनी सिंधुदुर्ग पासिंगच्या वाहनांना १०० टक्के टोलमाफी देण्याची मागणी करत यापूर्वी आंदोलने केली होती. मात्र ,त्याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. त्यामुळे टोल बाबत जिल्हावासीयांमध्ये संभ्रम अजूनही कायमच आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर टोल वसुली होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ओसरगाव टोल नाक्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.