ठाकरेंवर टीका करण्यापलीकडे व्हिजनच नाही, सतीश सावंतांचा नितेश राणेंना टोला

By सुधीर राणे | Published: November 23, 2023 11:40 AM2023-11-23T11:40:09+5:302023-11-23T11:40:37+5:30

जिल्ह्याचे प्रश्न किती वेळा मांडले?

There is no vision beyond criticizing Thackeray, Satish Sawant criticizes Nitesh Rane | ठाकरेंवर टीका करण्यापलीकडे व्हिजनच नाही, सतीश सावंतांचा नितेश राणेंना टोला

ठाकरेंवर टीका करण्यापलीकडे व्हिजनच नाही, सतीश सावंतांचा नितेश राणेंना टोला

कणकवली : भाजपाचे आमदार नितेश राणे यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करण्यापलीकडे कोणतेही व्हिजन नाही. त्यांनी भाजपा प्रवक्ते म्हणून कितीवेळा जिल्ह्याचे प्रश्न मांडले. एकदा तरी जिल्ह्यातील शेतकरी किंवा अन्य कामासंदर्भात आवाज माध्यमांमधून उठवला का? असा सवाल उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कणकवली विधानसभा मतदारसंघ प्रमुख सतीश सावंत यांनी केला आहे.

तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे गुरुवारी सिंधुदुर्गातील खळा बैठकांच्या माध्यमातून शिवसैनिक आणि जनतेशी थेट संवाद साधणार आहेत, त्यासाठी शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, उपशहर प्रमुख महेश कोदे, विलास गुडेकर आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. कलमठ येथे खळा बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यांचा दौरा हा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविण्यासाठी आहे. कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे त्यांचे स्वागत केले जाईल. त्यानंतर खळा बैठकीच्या माध्यमातून ते शिवसैनिकांशी थेट संवाद साधतील.
चौकट

भाजपच्या नेत्यांनी दिशाभूल करू नये

शेतकरी फळ पीक विम्यासाठी शासनाने रिलायन्स कंपनीची नियुक्ती केली आहे. त्या कंपनीकडे प्रशासकीय वेदर डाटा उपलब्ध नाही. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून ३८ हवामान केंद्र मंजूर केली होती. त्यापैकी १८ केंद्रांवर अद्यापही यंत्रणा नाही. आता नव्याने विमा काढण्यासाठी त्या विमा कंपनीचे पोर्टल उघडलेले नाही. अनेक शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांनी जनतेची दिशाभूल करु नये. शेतकऱ्यांसाठी कोण काय करतो हे शेतकऱ्यांना सांगण्याची गरज नाही.

३० जूनला विमा जाहीर करण्याची मागणी करणार

खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्व विमा कंपनीचे अधिकारी यांना बोलावून ३० जूनला विमा जाहीर करण्याची मागणी करणार आहोत तसेच आता विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना मुदतवाढ मिळायला हवी, अशी मागणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे करणार आहोत, असेही सावंत यांनी सांगितले.

Web Title: There is no vision beyond criticizing Thackeray, Satish Sawant criticizes Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.