विकास झालाच पाहिजे

By admin | Published: June 29, 2015 11:12 PM2015-06-29T23:12:19+5:302015-06-30T00:17:32+5:30

दादा इदाते यांनी स्पष्ट केली भूमिका

There must be development | विकास झालाच पाहिजे

विकास झालाच पाहिजे

Next

भटक्या जाती - जमातींवर या देशात वर्षानुवर्षे अन्याय होत आला आहे. या जातींवर पूर्वी ब्रिटिशांनी गुन्हेगारी जमात म्हणून अन्याय केला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात या जातीचे फार मोठे योगदान आहे. ब्रिटिश गेले, देश स्वतंत्र झाला. मात्र, स्वतंत्र भारतात या समाजाची स्थिती सुधारली नाही. भटकंती करुन पशुपक्ष्यांप्रमाणे जीवन जगण्याची वेळ या समाजावर आली आहे. स्वातंत्र्यानंतर पोट भरण्यासाठी या जाती देशभर विविध प्रांतात भटकत राहिल्या. ज्या ठिकाणी स्थिर होण्यासाठी योग्य जागा मिळाली, त्या ठिकाणी पोटासाठी त्या स्थिरावल्या. मात्र, काही जाती अजून भटकंती करीत आहेत. त्यांना स्वत:ची जात कोणती, प्रांत कोणता, हेच माहीत नाही. पारंपरिक कलेतून भटकंती करत पशूप्रमाणे जीवन जगणे, हेच त्यांच्या नशिबी आले आहे. ही परिस्थिती बदलून भटक्या जाती - जमातीला सन्मानाने जगता यावे, त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास व्हावा, यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.
- दादा इदाते, अध्यक्ष, भारत सरकार भटक्या विमुक्त जाती - जमाती आयोग (ऊठळ)

प्रश्न : आयोग काय आहे, ध्येय कोणते?
उत्तर : भारत सरकारने विमुक्त जाती - जमाती, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दुर्लक्षित, दुर्बल घटक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीवर ध्यान देण्याची गरज असल्याचे लक्षात आले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजतागायत आपल्या देशातील एक वर्ग अनादिकाळापासून पशूप्रमाणे भटकंती करुन जीवन जगत आहे. अशा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या आयोगाची स्थापना केली. आयोगाच्या शिफारशीप्रमाणे या समाजाचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय केंद्र सरकारचे आहे. या दुर्लक्षित घटकाचा शैक्षणिक, आर्थिक विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून या आयोगाची स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
प्रश्न : विखुरलेल्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न कसा असेल ?
उत्तर : देशभर विखुरलेल्या या समाजाची स्थिती, जीवनमान, जगणे, राहाणे, कौटुंबिक स्थिती, स्त्रियांची स्थिती, शिक्षण, आरक्षण मिळते का? भटकंती करत असल्याने सुविधा मिळतात का? देशभरातील भटका समाज एकत्र करणे, देशातील विविध भागातील भटक्या समाजाच्या स्थितीचा अभ्यास करून शिफारस करणे, आयोगाचे अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी आहे. त्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. आयोगाने केलेल्या शिफारशींचा सरकारने विचार केल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होईल.
प्रश्न : देशातील भटक्या समाजापर्यंत कसे पोहोचणार आहात?
उत्तर : देशातील विविध भागात विखुरलेल्या या समाजापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्या सहा महिन्यात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, उत्तरप्रदेश या राज्यांतील अधिक लोकसंख्या असलेल्या भागाचा दौरा केला. भटक्यांची घटना असलेल्या भागातील लोकांचे जीवनमान, शैली, कला, कुटुंबातील व्यक्तीचे शिक्षण, स्त्रियांचे राहणीमान याचा अभ्यास करण्यात येत आहे. प्रत्येक राज्य सरकारशी चर्चा करुन तज्ज्ञांशी बैठका सुुरु आहेत. भटक्या समाजावर लिखाण करणारे अभ्यासक, साहित्यिक, लेखक यांच्या गाठी-भेटी करुन भटक्या समाजाचा इतिहास, जीवनमान समजावून घेण्याचा प्रयत्न पहिल्या टप्प्यात केला आहे. यापूर्वीच्या सरकारने केलेल्या शिफारसी, रेणके आयोगाच्या शिफारसी, अभ्यासकानी मांडलेली मते याचा आधार घेऊन त्या - त्या भागातील भटक्या समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरु आहे.
प्रश्न : महाराष्ट्रातील भटक्या समाजाचे वास्तव काय आहे ?
उत्तर : महाराष्ट्रातील अनेक भागात भटक्या जाती - जमातीची स्थिती फारच दयनीय आहे. कोलाटी, जोगवा, वासुदेव, भामरा, जोशी, कैकाडी, डोंबारी या जातींचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत. पोटासाठी भटकंती करत १२ महिने फिरणारा हा समाज पशूप्रमाणे जीवन जगत आहे. समाजाकडून वर्षानुवर्षे त्यांच्यावर अन्याय होत आहे. आपण या देशाचे नागरिक आहोत, हासुद्धा पुरावा त्यांच्याकडे नाही. गावात घर नाही, शिवारात शेत नाही. या गावातून त्या गावात पोटासाठी भटकंती करत जायचे, त्या ठिकाणी पाल ठोकायची व पुढचा प्रवास सुरु करायचा. असं भटकं जीवन जगताना सोबत कुत्री, मांजर, गाढव, घोडा, सामान, मुलं, कुटुंब - संसार घेऊन फिरत राहायचं. त्यामुळे कुठही त्याची नोंद होऊ शकली नाही. मुलांना शिक्षण नाही, सरकारी योजनेचा लाभ नाही, घर नाही, अशा स्थितीत उदरनिर्वाह करणाऱ्या या समाजाचे वास्तव सरकारपुढे मांडून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास करणे, हेच ध्येय डोळ्यासमोर आहे.
प्रश्न : प्रत्येक राज्यात भटक्या जाती - जमातींची वेगळी ओळख आहे. त्यांचे प्रश्न कसे सोडविणार?
उत्तर : केंद्र व राज्य सरकार यामध्ये भटक्या जाती - जमातींबद्दल वेगवेगळे समज आहेत. महाराष्ट्रात वंजारा ही जात आहे. तीच जात राजस्थानमध्ये बंजारा या नावाने ओळखली जाते. त्यांचे राहणीमान, पारंपरिक वेशभूषा व प्राचीन कला यावरुन अभ्यास करुन त्या जाती ज्या राज्यात स्थिरावल्या आहेत, त्यांना त्या राज्य सरकारला सूचना देऊन त्यांचा विकास करण्यासाठी शिफारशी करू. केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने या जातीचा विकास करण्यात येईल. देशातील भटका समाज कोणत्याही राज्यात असो त्या ठिकाणी त्यांना सवलती देण्यात याव्यात, त्यांचा विकास व्हावा, अशीच शिफारस करण्यात येईल.
प्रश्न : कार्यकाळ केवळ ३ वर्षांचा आहे. तुम्ही कसा न्याय देणार?
उत्तर : महाराष्ट्रात युती सरकारच्या काळात दादा इदाते समितीच्या माध्यमातून काम केले आहे. गेली २५ वर्षे या समाजाचे सुख-दु:ख जवळून पाहिले आहे. त्यांच्या समस्या, जगण्याचे प्रश्न, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मागासलेपणा जवळून पाहिले आहे. कुठेही चोरी किंवा दरोडा झाला तरीही पोलीस या जातीला बळीचा बकरा बनवून जेलमध्ये टाकतात. त्यांच्यावर आजही अन्याय सुरु आहेत. अनेक भटक्या जातीच्या स्त्रियांवर दिवसाढवळ्या अत्याचार होत आहेत. या सर्व परिस्थितीची जाण आहे.
प्रश्न : भटक्या जाती - जमातीत काही जातीचा समावेश होणे गरजेचे आहे का?
उत्तर : त्यावेळच्या परिस्थितीनुसार काही जाती - जातीचा भटक्या जाती - जमातीमध्ये समावेश करण्यात आला होता. काही जातींचा राजकीय दबावापोटी चुकीच्या पद्धतीने समावेश करण्यात आला आहे. मात्र, जो समाज खरोखर भटका आहे. परंतु तो विखुरलेला आहे. अशा समाजाची नोंद झालेली नाही. अशा जातीला भटक्या जातीत समाविष्ट करायला हवे. काही जातींच्या व्होट बँकेवर नजर ठेवून त्यांचा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जातीत समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे दुर्लक्षित घटकाला न्याय मिळत नाही, दुर्लक्षित घटक समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे.
- शिवाजी गोरे

Web Title: There must be development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.