देवगडच्या विकासासाठी एकविचाराने काम करण्याची गरज

By admin | Published: July 3, 2016 11:04 PM2016-07-03T23:04:27+5:302016-07-03T23:04:27+5:30

नीतेश राणे : देवगड येथे कोकण माती प्रतिष्ठानतर्फे गुणवंतांचा सत्कार

There is a need to work with one thought for the development of Devgad | देवगडच्या विकासासाठी एकविचाराने काम करण्याची गरज

देवगडच्या विकासासाठी एकविचाराने काम करण्याची गरज

Next

देवगड : देवगडचा विकास करण्यासाठी आपण व्हीजन तयार केले असून ज्यावेळी देवगडला २४ तास पाणी मिळेल त्याचवेळी खऱ्या अर्थाने देवगडचा विकास झाला असे म्हणता येईल. यासाठी राजकीय चष्मा बाजूला ठेवून विकासाकडे बघण्याची गरज असून जामसंडे देवगडच्या विकासासाठी कुठलीही तडजोड करणार नाही. तसेच स्थानिक विकासासाठी एकविचाराने खांद्याला खांदा लावून काम करण्याची गरज आहे. देवगड जामसंडे शहरातील जनतेने काय चूक केली की, देवगड तालुका २९ वर्षे मागासलेला राहीला असल्याचे मत आमदार नीतेश राणे यांनी येथे व्यक्त केले.
देवगड येथील इंद्रप्रस्थ सभागृहात कोकण माती प्रतिष्ठान देवगड व सिंंधुरत्न फाऊंडेशन सिंंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने येथे समाजातील विविध मान्यवरांचा सत्कार तसेच विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, कोकणमाती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, प्रकाश राणे, डॉ. मिलिंद कुळकर्णी, अ‍ॅड. अविनाश माणगांवकर, बाळ खडपे, डॉ. सुनील आठवले, निशिकांत साटम, सभापती रवींद्र जोगल, संजय बोंबडी, चारूदत्त सोमण आदी उपस्थित होते.
राणे म्हणाले की, २९ वर्षे देवगडचा विकास खुंटला असून हा आपणाला आता भरून काढायचा आहे. स्थानिक विकासाची तळमळ नसल्यानेच यापूर्वी असे कार्यक्रम झाले नाहीत. देवगड विकासासाठी पक्षविरहित संवाद साधण्यासाठी आपण आलो आहोत. येथील प्रश्न मांडण्याची तळमळ, विकासात्मक प्रश्न मांडण्याची जिद्द बाळगुन आपण काम करीत आहोत. केवळ घोषणाबाजी पेक्षा स्थानिक विकासाप्रती किती निष्ठा आहे हे महत्वाचे आहे. विकासासाठी दृष्टी बदलण्याची गरज आहे. पायाभूत सुविधाच नसतील तर आदर्श गाव कसा तयार होणार? स्थानिक प्रश्नासाठी जनतेने आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. स्थानिक, मूळ प्रश्नांना विरोधक बगल देत वारंवार घोषणाबाजी करीत आहेत. आमचा पराभव करण्याची भाषा करून येथील आरोग्य, पाणी प्रश्न सुटणार आहेत का असा प्रश्नही त्यांनी विचारला. यावेळी त्यांनी विमानतळाच्या विषयावरून पालकमंत्री दीपक केसरकर यांना तर मेट्रोच्या विषयावरून प्रमोद जठार यांच्यावर टिप्पणी केली.
यावेळी देवगड जामसंडे शहर विकासावर निशिकांत साटम, दत्ता सामंत, डॉ. सुनिल आठवले, चारूदत्त सोमण, सुरेश सोनटक्के आदींनी आपली मते मांडली. यावेळी विविध मान्यवरांचा तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते झाला. देवगडवरील संकेतस्थळाचे उद्घाटनही त्यांनी केले. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षिस वितरणही त्यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक प्रकाश गायकवाड यांनी केले. सुत्रसंचालन करून आभार श्रीजित मराठे यांनी मानले. यावेळी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत संजीव राऊत, नीलेश जाधव अनुक्रमे प्रथम व द्वितीय आले. तर संजय धुरी व डॉ. सुनील आठवले यांना विभागून तृतीय क्रमांक दिला. विनायक अपराज व श्रेयशी शिरसाट यांना उत्तेजनार्थ मिळाला. तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचाही सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: There is a need to work with one thought for the development of Devgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.