कोकम पिकाबाबत शेतकऱ्यांमध्ये अनास्था, बाजारपेठेत योग्य दर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 02:15 PM2019-05-30T14:15:28+5:302019-05-30T14:17:34+5:30
बाळकृष्ण सातार्डेकर रेडी ( सिंधुदुर्ग ) : रतांबे अर्थात कोकमचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या आधी ...
बाळकृष्ण सातार्डेकर
रेडी (सिंधुदुर्ग) : रतांबे अर्थात कोकमचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या आधी जास्तीत जास्त पीक ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात शेतकरी दिसत आहेत. कोकमच्या व्यवसायातून येथील शेतकºयाला दोन महिन्यांचा रोजगार उपलब्ध होतो. पण कोकम उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत हवा तसा दर बाजारपेठेत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये या व्यवसायाबाबत अनास्था वाढत चालली आहे.
उन्हाळी हंगामात आंबा, काजू व कोकम ही तीन महत्त्वाची फळेकोकणातील विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेड्यापाड्यात पहायला मिळतात. या दिवसात येणाऱ्या पर्यटक व पाहुण्यांचे आगळेवेगळे स्वागत काजूगर, आंबा, फणसाचे गरे व कोकम सरबत देऊन केले जाते.
पण आंबा व काजू या दोन फळाप्रमाणे कोकमसाठी म्हणाव्या तशा प्रमाणात चांगली बाजारपेठ व प्रसिद्धी मिळत नसल्याने या व्यवसायाकडे दुर्लक्ष होत आहे. या फळापासून तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना बाजारपेठेत योग्य दर मिळत नसल्याची खंत शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
कोकमचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. रतांब्यापासून ओली आमसुले, (आगळी सोले), कोकम सरबत, जेवणानंतर पचनासाठी सोलकढी आदी विविध उत्पादने घेतली जातात. सध्या बाजारपेठेत आमसुले आगळी सोले १५० ते १६० प्रतिदराने, कोकम मुटले ३० रुपये प्रति नग या दराने उपलब्ध आहेत.
कोकम तयार करण्याची पद्धत
कोकम तयार करताना सर्वप्रथम लाल झालेला रतांबा मजुरांकरवी काढावा लागतो. त्यानंतर तो घरी आणून घरातील माणसे तसेच मजूरवर्ग लावून त्या फळांचा रस, बिया व पाकळ््या वेगळ््या केल्या जातात. पाकळ्या वेगळ््या केल्यानंतर त्या चारवेळा आगळ रसामध्ये भिजवून कडक उन्हात सुकविल्या जातात. यासाठी आठ ते दहा दिवसाचा कालावधी जातो. तयार झालेली आमसुले जवळील बाजारपेठेत विक्रीसाठी नेली जातात.
कोकम उत्पादने
आमसुले (आगळी सोला) : सर्वसामान्य घरापासून ते पंचरातांकित हॉटेलमध्ये मच्छीकढी, आमटी, कालवण व सोलकढीला उत्कृष्ट चव येण्यासाठी व मच्छीकढी उकळताना प्रमाणानुसार आत आमसुले टाकली जातात. पित्त झाले तर आमसुले पाण्यात भिजवून लावतात. कोकम रस व कोकम सरबत पिण्यासाठी दिला जातो.
मुटले : कोकमच्या बियापासून तयार केलेल्या मुटल्याचा वापर आहारात चपातीवर कडवन तेल म्हणून केला जातो. थंडीच्या दिवसात पायांना, ओठांना भेगा पडल्यास मुटले कडवून घासून लावल्यास भेगामधील दाह शांत होऊन भेगा बऱ्या होतात.