‘सी-वर्ल्ड’ हलविण्याचा निर्णय नाही

By admin | Published: September 4, 2016 11:28 PM2016-09-04T23:28:24+5:302016-09-04T23:28:24+5:30

दीपक केसरकर : युतीचा निर्णय पक्षप्रमुख घेणार

There is no decision to move 'C-World' | ‘सी-वर्ल्ड’ हलविण्याचा निर्णय नाही

‘सी-वर्ल्ड’ हलविण्याचा निर्णय नाही

Next

 सावंतवाडी : सीवर्ल्ड प्रकल्प देवगडला हलवण्याबाबतची घोषणा खासदार विनायक राऊत यांनी केली असली, तरी राज्य शासनाचा अद्याप असा कोणताही निर्णय झाला नाही. तसेच हा प्रकल्प अद्यापपर्यत तोंडवली वायंगणी येथेच आहे, असे मत सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. आगामी नगरपालिका निवडणुकामध्ये युती करण्याबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरेच निर्णय घेतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ते सावंतवाडीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
खासदार विनायक राऊत यांनी वायंगणी-तोंडवली येथील ग्रामस्थांचा विरोध असेल तर हा प्रकल्प देवगड येथे हलविण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यावर मंत्री केसरकर म्हणाले, सी-वर्ल्ड प्रकल्पाबाबत अद्याप राज्य शासनाचा कोणताही निर्णय झाला नाही. खासदार विनायक राऊत यांनी माझ्याशी या प्रकल्पाबाबत चर्चा केली नाही. आम्ही एकत्र भेटलो की याबाबत चर्चा करु. वायंगणी-तोंडवली प्रकल्प हलविणे हा शेवटचा उपाय असून, आम्ही ग्रामस्थांच्या मागणीनुसार १४०० एकरवरून हा प्रकल्प साडेतीनशे एकरमध्ये करण्याचे ठरवले आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणात निधी येत आहे. अनेक गावांना आम्ही पर्यटनमधून निधी देत आहोत. तिलारीला आतापर्यंत कधीही पर्यटनासाठी निधी देण्यात आला नव्हता, तेवढा निधी यावेळी शासनाने दिला आहे. आंबा नुकसानीची कधी नाही तेवढी मदत यावेळी देण्यात आली. आम्हाला जिल्ह्याचा विकास करायचा असून, हा विकास शांततेच्या मार्गातून करायचा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक प्रकल्प येऊ घातले आहेत. त्यातून रोजगार निर्मितीही होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
ताज प्रकल्पाच्या जमिनीबाबत आठवडाभरात निर्णय
वेळागर येथील तीन जमिनी वेगवेगळ्या उद्योजकांना पंचतारांकित हॉटेल बांधण्यासाठी देण्यात आली होत्या. त्यातील एका कंपनीने हॉटेल बांधले आहे. मात्र, ताज व ओबेरॉयने अद्याप हॉंटेल बांधली नाहीत. ओबेरॉयच्या जमिनीवर एमटीडीसी प्रकल्प उभारत आहे. तर ताजच्या जमिनीबाबत येत्या आठवडाभरात निर्णय घेतला जाईल, असेही केसरकर यांनी सांगितले. या जमिनी विकासासाठी दिल्या, तेथे प्रकल्प उभे राहिले पाहिजेत ही आमची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.
नगरपालिकेबाबतचा निर्णय पक्षप्रमुख घेतील
सावंतवाडी नगरपालिका निवडणुका होण्यास अद्याप वेळ आहे. मात्र, उमेदवार ठरविणे, युती करणे याबाबतचा निर्णय आमच्या पातळीवर होणार नाही. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे निर्णय घेणार आहेत, असे मत केसरकर यांनी मांडले. तसेच विकासकामे केल्याने आम्हालाच पंसती मिळेल, असे सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.

Web Title: There is no decision to move 'C-World'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.