जनहित निर्णयांबाबत सबब चालणार नाही
By Admin | Published: March 4, 2016 10:41 PM2016-03-04T22:41:18+5:302016-03-04T23:59:40+5:30
नीतेश राणे : कणकवलीतील दक्षता समिती सभेत प्रतिपादन ; जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न राहील
कणकवली : दक्षता समितीच्या सभेत उपस्थित करण्यात आलेले मुद्दे आमच्या स्तरावरुन शासनापर्यंत पोहचविण्यात येतील. तसेच जनतेला न्याय देण्याचा आमचा निश्चितच प्रयत्न राहील. मात्र, या सभेत घेण्यात आलेल्या निर्णयांवर पुढील सभेपूर्वी प्रशासनाच्यावतीने कार्यवाही करण्यात यावी. हे जनतेच्या हिताचे निर्णय असल्याने त्याबाबत कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही, असे आमदार नीतेश राणे यांनी सांगितले.
दरम्यान, या सभेत घरगुती गॅस सिलिंडरचा कोठा वाढवून मिळावा, एपीएल कार्डधारकाना धान्य पुरवठा करण्यात यावा, गॅस सिलेंडर धारकाना रॉकेल मिळावे तसेच रास्त दराच्या धान्य दुकानदाराना कमीशन वाढवून मिळावे असे विविध ठराव घेण्यात आले.
कणकवली तालुका व नगरपंचायत दक्षता समितीची संयुक्त बैठक येथील तहसील कार्यालयात शुक्रवारी समितीचे अध्यक्ष आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी समिती सचिव तहसीलदार समीर घारे, गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर, पंचायत समिती सभापती आस्था सर्पे, उपसभापती महेश गुरव, नायब तहसीलदार आर. जे. पवार, समिती सदस्य तन्वी मोदी, नंदिनी धुमाळे, स्मिता परब, संजय पाताडे, वैभवी पाटकर, सुरेखा भिसे, वैदेही बाबर देसाई, शामल म्हाडगुत, विशाल हर्णे, अस्लम निशानदार, आनंद आचरेकर, किरण म्हाडगुत, पुरवठा विभागाचे सुद्र्रिक, गोसावी, पुरवठा निरीक्षक गावडे उपस्थित होते.
या सभेत विविध विषयांवर चर्चा करून ठराव घेण्यात आले. दोन महिन्यांचे धान्य ज्यावेळी एका महिन्यात मिळते. अशावेळी ग्राहकांना दोन्ही महिन्याचे धान्य एकावेळी नेण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी तन्वी मोदी यांनी केली. तसेच गरीब ग्राहकांना दोन वेळा धान्य नेण्यासाठी दुकानावर यावे लागणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार दुकांदाराना सूचना देण्यात येईल असे तहसीलदारांनी यावेळी सांगितले.
केशरी कार्ड धारकांना धान्य मिळण्याची गरज असताना त्यापैकी २५ टक्केहून अधिक कार्डधारक अजून धान्यापासून वंचित आहेत. त्यांनाही धान्य देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. दक्षता समितीच्या सर्व सदस्यांना ओळखपत्र लवकरच देण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
बचतगटांना रास्त दराचे धान्य दुकान चालविण्यासाठी देण्यात यावे, अशी मागणी नंदिनी धुमाळे यांनी केली. याबाबतचा परवाना मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.
काही ठिकाणी रास्त दराचे धान्य दुकानदार ग्राहकांना चांगली वागणूक देत नाहीत. उद्धट उत्तरे देतात अशी तक्रार काही सदस्यांनी केली. त्यांची नावे सांगितल्यास चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे तहसीलदारांनी सांगितले.
काही गावातील रास्त दराची धान्य दुकाने सोयीने उघडली जातात. त्यांना सूचना करण्यात यावी. तसेच सर्व दुकानांबाहेर कामकाजाची वेळ, शिल्लक धान्य साठा आदिबाबत फलक लावण्यात यावा. अशी सूचना दुकानदारांना करण्यात येणार आहे. आठवडा बाजारा दिवशीच त्या त्या गावात ग्राहकांना रॉकेल देण्यात यावे. तसेच ग्रामीण भागात रॉकेलची जास्त गरज असल्याने त्याचा पुरवठा करण्यात यावा असा ठराव यावेळी घेण्यात आला.
कणकवली येथील शासकीय गोदामासाठी रिक्त असलेले सुरक्षा रक्षकाचे पद तत्काळ भरण्यात यावे. तसेच त्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. (वार्ताहर)
शासकीय गोदाम उभारण्याबाबत चर्चा करणार!
जानवली येथील देवराईच्या ठिकाणी गोदाम बांधण्याबाबत प्रशासनाकडून कार्यवाही सुरु होती. तेथील ग्रामस्थांनी हरकत घेतल्याने कार्यवाही थांबविण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी संबंधित ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या भावना समजून घेण्यात येतील. तसेच त्यानंतर गोदामाबाबत निर्णय घेऊ असे आमदार नीतेश राणे यांनी सांगितले.