पालकमंत्र्यांवर साधा सेनेचाही विश्वास नाही
By admin | Published: September 16, 2015 12:40 AM2015-09-16T00:40:37+5:302015-09-16T00:42:30+5:30
परशुराम उपरकर : नाईकांनी अटक करून घ्यावी
मालवण : आंबा, काजू नुकसान भरपाई मागे जाऊ नये म्हणून शिवसेना आमदार, खासदार यांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यावी लागत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांवर जनतेचा सोडाच, पण साधा शिवसेनेचाही विश्वास नसल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील गंभीर समस्या सोडविण्यास पालकमंत्री दीपक केसरकर अपयशी ठरले असल्याची टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पालकमंत्री केसरकर यांच्यावर केली आहे, तर आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल आहे. त्यामुळे स्वत:हून अटक करून घ्यावी, असे आवाहनही उपरकर यांनी केले आहे.
मालवण शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष गणेश वाईरकर, अमित इब्रामपूरकर, विनोद सांडव, दत्ता रेवंडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. जनतेला न्याय मिळण्यासाठी आम्हीही आंदोलने केली. मात्र, आमच्यावर गुन्हे दाखल झाल्यावर आम्ही स्वत: पोलिसांच्या स्वाधीन झालो. पोलीस प्रशासन आमदारांना वेगळा न्याय देत असतील तर सर्वसामान्यांना तोच न्याय द्यावा. आमदार नाईक यांनी स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन होण्याचे आव्हान उपरकर यांनी नाईक यांना केले आहे. तर मालवण शहर विकास आराखड्याबाबत विचारले असता, उपरकर म्हणाले काही ठिकाणी चांगली आरक्षणे आहेत. मात्र, काही रस्ते व आरक्षण हे जनतेसाठी अन्यायकारक आहे. ती लादली जात असतील तर त्याला विरोध राहील. मनसे जनतेच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)