भाजपमध्ये घराणेशाही नाही
By admin | Published: December 13, 2015 12:38 AM2015-12-13T00:38:43+5:302015-12-13T01:12:50+5:30
वर्षा भोसले : सावंतवाडीत निवासी शिबिर
सावंतवाडी : भाजप घराणेशाही विरहित पक्ष असून आमच्याकडे घराणेशाही चालत नाही. प्रत्येक कार्यकर्ता हा स्वकर्तृत्वाने मोठा होत असतो. आपली सत्ता केंद्रात व महाराष्ट्रात आहे. तिचा वापर करून जनतेपर्यंत पोहचा, असे आवाहन भाजपच्या माजी सरचिटणीस वर्षा भोसले यांनी केले. त्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्यावतीने माजगाव येथे आयोजित निवासी कार्यकर्ता प्र्रशिक्षण शिबिरात बोलत होत्या.
यावेळी ठाण्याचे दीपक जाधव, जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस राजन म्हापसेकर, श्यामकांत काणेकर, मनोज नाईक, मंदार कल्याणकर, शितल राऊळ आदी उपस्थित होते. ठाणे येथील दीपक जाधव यांनी पक्षावर केलेले गीत सादर करीत आता कार्यकर्त्यांनो जागे व्हा आणि एकसंघ भारत घडवूया, असे मार्गदर्शन केले.
निवासी शिबिरातून पक्षाची ध्येयधोरणे शिका, त्यांचा वापर समाजासाठी करा. दिनदयाल उपाध्याय यांनी संघाचे काम करीत असताना सर्वांना विश्वासात घेत देश एकसंघ कसा राहील याचा पहिला विचार केला होता. मात्र, काँग्रेसने देशातील गरीब जनतेला नेहमीच गरिबीतच ठेवले, असा आरोपही यावेळी भोसले यांनी केला. भाजपचे सावंतवाडी विधानसभा निवडणुकीपुरते निवासी शिबिर दोन दिवस चालणार असून, या शिबिराचा समारोप रविवारी पक्षाचे नेते सतीश धोंड यांच्या उपस्थितीत होणार आहे. शिबिराच्या प्रमुख वर्षा भोसले यांनी प्रत्येक कार्यकर्त्याने आपण सत्तेत असल्याची जाणीव ठेवली पाहिजे. सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन केला पाहिजे. भाजप असा पक्ष आहे, तोच सर्वसामान्य तळागळातील कार्यकर्त्याला बळ देऊ शकतो. त्यामुळे आपले अनेक कार्यकर्ते मोठमोठ्या पदावर जाऊन बसले आहेत, असे सांगत आपल्या पक्षात घरणेशाही नसल्याचा टोला काँग्रेस व शिवसेनेला लगावला. शिबिरात रंगनाथ गवस, सुशांत पांगम, श्वेता कोरगावकर, अन्नपूर्णा कोरगावकर, अॅड. सुषमा खानोलकर, शैलेश तावडे, उमेश साळगावकर, महेश पांचाल, अमित परब, महेश सावंत सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)
...यापुढे भाजप स्वतंत्रपणे लढेल : काळसेकर
४जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी भाजपची ध्येयधोरणे तसेच जिल्ह्यातील भाजपच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली. यापुढे भाजप स्वतंत्रपणे आपले काम करेल आणि जिल्ह्यात पक्षाला यश मिळवून देईल, असे सांगितले.