नगरपंचायतीवर कचरा प्रकल्पाचा आर्थिक भार नाही : समीर नलावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 08:13 PM2019-01-23T20:13:21+5:302019-01-23T20:15:27+5:30
कणकवलीत होत असलेल्या कचरा प्रकिया प्रकल्पाचा कोणताही आर्थिक भार नगरपंचायतीवर पडणार नाही. तसेच नगरपंचायत अडचणीत येईल असा कोणताही करार आम्ही केलेला नाही. प्रकल्पाचा सर्व खर्च आणि नफ्या तोट्याची सर्वोतोपरी जबाबदारी ए.जी. डॉटर्स या कंपनीवरच असणार आहे. मात्र शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक अपूर्ण माहितीवर कचरा प्रकल्पावरून टीका करीत आहेत. असे स्पष्टीकरण नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी येथे दिले.
कणकवली : कणकवलीत होत असलेल्या कचरा प्रकिया प्रकल्पाचा कोणताही आर्थिक भार नगरपंचायतीवर पडणार नाही. तसेच नगरपंचायत अडचणीत येईल असा कोणताही करार आम्ही केलेला नाही. प्रकल्पाचा सर्व खर्च आणि नफ्या तोट्याची सर्वोतोपरी जबाबदारी ए.जी. डॉटर्स या कंपनीवरच असणार आहे. मात्र शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक अपूर्ण माहितीवर कचरा प्रकल्पावरून टीका करीत आहेत. असे स्पष्टीकरण नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी येथे दिले.
कणकवली नगरपंचायत कार्यालयातील आपल्या दालनात समीर नलावडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, बांधकाम सभापती अभिजित मुसळे, आरोग्य सभापती अॅड.विराज भोसले , गटनेते संजय कामतेकर आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी समीर नलावडे म्हणाले, कणकवलीतील या प्रकल्पाच्या रूपाने महाराष्ट्रात प्रथमच 900 कोटींची गुंतवणूक असलेला कचरा प्रक्रिया प्रकल्प होत आहे. यात 60 मेगावॅटचा वीज निर्मिती प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाच्या वीज निर्मितीमधून तसेच इतर उत्पादनातून जे उत्पन्न मिळेल त्याच्या पैकी एक टक्का रक्कम नगरपंचायतीला मिळणार आहे.
25 वर्षाच्या लीजवर संबधित कँपनीला नगरपंचायतीने जागा भाडे तत्वावर दिली आहे. त्यामुळे अत्यांत पारदर्शकपणे करार करण्यात आला आहे. कचरा प्रकल्पाबाबत शहरातील नागरिक तसेच विरोधी पक्षातील नगरसेवक, राजकीय पदाधिकारी चर्चेला येऊ शकतात. त्यांच्या सर्व मुद्दयांवर खुलेआम चर्चा करण्याची आमची तयारी आहे .
कचरा प्रकल्पाबाबत ए. जी.डॉटर्स कंपनीशी झालेला करार हा खुला आहे. यात 175 मेट्रीक टन कचरा संकलन करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली नाही. ती जबाबदारी त्या कंपनीची आहे. फक्त कणकवली नगरपंचायत हद्दीत दररोज जमा होणारा पाच टन कचरा आम्ही त्या कंपनीला देणार आहोत. तर कचरा संकलन आणि त्यावरील प्रक्रिया करण्याची सर्व जबाबदारी कंपनीची आहे.
या कचरा प्रकल्पासाठी नगरपंचायतीकडील 3 एकर जागा भाडे तत्वावर ए.जी .डॉटर्स कंपनीला देण्यात आली आहे. वर्षाला 3 लाख 57 हजार भाडे आणि परतावा न देण्याच्या अटीवर डिपॉझिट साडे सहा लाख रूपये कंपनीने नगरपंचायतला द्यावेत. असा करार आम्ही केला आहे.
ते पुढे म्हणाले, शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांनी या प्रकल्पाबाबत अभ्यास केला. त्यांनी मांडलेल्या आक्षेपाला आम्ही सभागृहातच सविस्तर उत्तरे दिली होती. तरीही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रकल्पाबाबत आक्षेप मांडले. त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यास आम्ही तयार आहोत. त्याचबरोबर कुणाही नागरिकाला कचरा प्रकल्पाबाबत शंका असल्यास त्यांनी नगरपंचायतीमध्ये यावे, त्यांना प्रकल्पाची सर्व कागदपत्रे दाखवली जातील. आम्ही जबाबदारीने अभ्यासपूर्णरित्या हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणीही या प्रकल्पाबाबत विनाकारण गैरसमज पसरवू नये.
नाईकांचा अभ्यास परिपूर्ण नाही !
सुशांत नाईक यांनी प्रकल्पाचा अभ्यास केला आहे. मात्र, तो परिपूर्ण नाही. त्यांनी सत्तेत असताना कोणताहि प्रकल्प आणला नाही. पण आम्ही आणत असलेल्या प्रकल्पाला निदान त्यांनी पाठींबा द्यायला हवा होता. तसे झाले नाही हे दुर्दैव आहे. आम्ही कचरा प्रक्रिया प्रकल्पा बाबत जबाबदारी पूर्वकच निर्णय घेतला आहे. असेही समीर नलावडे यावेळी म्हणाले.