समाज परिवर्तनात साहित्यिक का नाहीत
By admin | Published: October 18, 2015 11:16 PM2015-10-18T23:16:43+5:302015-10-18T23:31:55+5:30
रामदास फुटाणे : रत्नागिरीत ‘कोमसाप’चे जिल्हा साहित्य संमेलन
रत्नागिरी : अभिनयक्षेत्रात काम करणारी मंडळी सामाजिक जाणिवेचे भान ठेवतात. आपण साहित्यिक आपल्या ३६५ दिवसांच्या व्यस्त जीवनातून बाहेर कधी येणार? आपण केवळ एखाद्या घटनेवर कविता लिहितो. त्यापलीकडे काहीच करत नाही. अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्यासारखी मंडळी दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करत असतील, तर साहित्यिकांनीही समाज परिवर्तनात प्रत्यक्ष सहभाग घेतलाच पाहिजे, अशा शब्दात ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांनी साहित्यिकांना फटकारले.
कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) आणि कवी केशवसूत स्मारक मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून रामदास फुटाणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष खासदार विनायक राऊत, उद्घाटक अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, ऊर्मिला पवार, आमदार उदय सामंत, ‘कोमसाप’चे केंद्रीय अध्यक्ष महेश केळुस्कर, केंद्रीय कार्याध्यक्षा नमिता कीर, कार्यवाह प्रशांत परांजपे, जिल्हाध्यक्ष सुरेश खटावकर, अण्णा राजवाडकर, विश्वस्त अरुण नेरुरकर, भास्कर शेट्ये, गजानन पाटील उपस्थित होते.नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर वाढत चाललेल्या असहिष्णुतेच्या निषेधार्थ पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांवर टीका करत फुटाणे म्हणाले, या तिघांपैकी कोणाच्या चळवळीत साहित्यिकांनी काम केले आहे का? जर काम केले असेल तर नक्कीच आपल्याला पुरस्कार परत करण्याचा नैतिक अधिकार आहे. आजचा समाज जातिव्यवस्थेला प्राधान्य देणारा, भावुक आहे. समाज परिवर्तनासाठी साहित्यिकाचे योगदान आवश्यक आहे. त्यामुळे साहित्यिकाच्या डोक्यात हवा घालून न घेता समाज परिवर्तनासाठी योगदान द्यावे. अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी एकत्र येऊन दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले. अनेक दानशूर मंडळींनी या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिला. वास्तविक अभिनयक्षेत्रात काम करणारी मंडळी सामाजिक जाणिवेचे भान ठेवत पुढे आले आहेत, त्याप्रमाणे साहित्यिकांनीही पुढे आले पाहिजे. दंगल झाली किंवा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली की, त्यावर एखादी कविता रचली जाते. त्यातून कवी वेदना मांडण्याचा प्रयत्न करतो. परंतु, यातून कविता रचल्याचा मिळणारा आनंद क्षणिक असतो. त्यापेक्षा साहित्यिकांनी वर्षाच्या ३६५ दिवसांच्या व्यस्त जीवनातून बाहेर येऊन समाज परिवर्तनासाठी योगदान देण्याची आवश्यकता आहे. समाजातील प्रत्येक घटकांचा साहित्यिकांनी आदर केला पाहिजे. (प्रतिनिधी)
समाजाचा उलट्या दिशेने प्रवास भयावह
सध्याचा समाज कुटुंबव्यवस्थेकडून उन्मत्त व्यवस्थेकडे जात असल्याचे सांगून फुटाणे म्हणाले, समाजाचा उलट्या दिशेने सुरू असलेला प्रवास भयावह आहे.
स्वप्नं विकणाऱ्या आर्थिक व्यवस्थेत मूठभर माणसेच पुढे जातील; मात्र अन्य मागे राहण्याची शक्यता आहे. कवी हा कोणत्या जातीचा, धर्माचा, राजकारण्यांचा प्रतिनिधी असता कामा नये.
साहित्यिक हा सामान्य माणसाच्या आत्म्याचा आवाज असला पाहिजे. आत्म्याचा आवाज त्याच्या रचनेत आला पाहिजे, असेही फुटाणे यांनी सांगितले.